

मांडवगण फराटा : ग्रामस्थांनीच जर बिबट्यांचा बंदोबस्त केला तर वन विभागाला किती पैसे द्यायचे हे जाहीर करा, असा संतप्त प्रश्न इनामगावच्या सरपंच अनुराधा प्रफुल्ल घाडगे यांनी वन विभागाला विचारला आहे. वन विभाग बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत करते, त्यावर घाडगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.(Latest Pune News)
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा व परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये तीन बालके आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे सरपंच संतप्त झाल्या आहेत, त्या म्हणाल्या की, बिबट्यांपासून संरक्षण हवे यासाठी वन विभागाने मध्यंतरी कुंपण बांधण्यासाठी इनामगाव येथील काही ग्रामस्थांकडून पैसे घेतले परंतु अद्याप त्या कुंपणाचे बांधकाम वन विभागाने करून दिलेले नाही. या भागातील नरभक्षक बिबट्या पकडला गेला की नाही, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे मांडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली फराटे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात मांडवगण फराटा, पिंपळसुटी, इनामगाव या भागांत बिबट्यांचा वावर सातत्याने दिसून येत आहे. सध्या गुऱ्हाळासाठी ऊसतोडीचे काम सुरू असल्याने बाहेरगावाहून आलेले कामगार आणि त्यांच्यासोबत असलेली लहान मुले उसाच्या फडांमध्ये फिरताना दिसतात, त्यांना परिसरातील बिबट्यांच्या धोक्याची कल्पना नसल्याने कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. वन विभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत, मात्र बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. बिबट्या रात्री रस्त्यावर दिसत असेल, तर तो पिंजऱ्यात का अडकत नाही? असे नागरिक विचारत आहेत.
बिबट्यांच्या भीतीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे, त्यामुळे ग्रामस्थांचा वन विभागावर रोष वाढला आहे. बिबट्याला तातडीने जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, तीन- चार दिवसांपासून सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्या आल्याचा हा व्हिडीओ नागरिकांमध्ये भीती वाढवणारा ठरतो आहे. याआधीही दोन बिबटे दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. हॉर्न वाजवून कसाबसा जीव वाचवला तरी देखील बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना झालेली नाही.