पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला करावी लागणार तारेवरची कसरत

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला करावी लागणार तारेवरची कसरत
Published on
Updated on

हिरा सरवदे

पुणे : नवीन प्रभागरचनेत जनता वसाहत-दत्तवाडी प्रभागात झोपटपट्ट्यांमधील मतदारांचा टक्का वाढल्याने गत निवडणुकीत मिळविलेल्या जागा टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तसेच, तुल्यबळ इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवार निवडताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या इच्छुकांकडूनही जोरदार तयारी केली जात असल्याने येथील निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Ward 37
Ward 37

झोपडपट्ट्यांचा परिसर म्हटलं की तेथील मतदार कोणत्या तरी एका नेत्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या प्रभागाखाली असणार, असा एकप्रकारचा समज सर्वत्र निर्माण झालेला आहे. मात्र, सिंहगड रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या विविध झोपडपट्ट्या याला अपवाद ठरल्या आहेत. जनता वसाहत, राजीव गांधी वसाहत, 132 वसाहत, पानमळा, गणेशमळा, दत्तवाडी, दांडेकर पूल, चुनाभट्टी असा विविध झोपडपट्ट्यांमधील मतदारांनी कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा शिक्का मारून घेतलेला नाही. या झोपडपट्ट्यांमधील मतदारांनी आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, रिपाइं अशा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.

महापालिकेच्या गत निवडणुकीत प्रभाग 30 मध्ये नीलायमपासून राजाराम पुलापर्यंत झोपडपट्ट्यांसह मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या सोसायट्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यातच चार सदस्यांचा प्रभाग झाल्याने मतदारांची संख्या 80 ते 90 हजारांच्या घरात गेल्याने आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या उमेदवारांचा आणि पक्षाचा निभाव लागला नाही. या प्रभागात शंकर पवार, आनंद रिठे, अनिता कदम हे भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया गदादे निवडून आल्या.

पुनर्रचनेमुळे समिकरणे बदलणार

पूर्वीच्या 30 नंबर प्रभागाची पुनर्रचना करून नव्याने 37 नंबरचा जनता वसाहत-दत्तवाडी असा प्रभाग तयार करण्यात आला आहे. या प्रभागात 67 हजार 332 एकूण मतदार असून, यामध्ये तब्बल 14 हजार मतदार अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील, तर 824 मतदार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आहे. यामुळे या प्रभागात एक जागा एससी प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. नव्या प्रभाग रचनेत जुन्या 30 प्रभागातील राजाराम चौक ते नवशा मारुती दरम्यानचा सोसायट्यांचा परिसर काढून तो प्रभाग 52 (नांदेडसिटी-सनसिटी) ला जोडण्यात आला आहे. तसेच जयभवानीनगर, राजीव गांधी वसाहत, 132 वसाहत हा झोपडपट्ट्यांचा परिसर काढून प्रभाग नं. 38 (शिवदर्शन-पद्मावती) ला जोडण्यात आला आहे. तसेच जुन्या प्रभागात नसलेल्या दत्तवाडीचा उर्वरित भाग, राजेंद्रनगर, पीएससी वसाहत, सचिन तेंडुलकर उद्यान हा परिसर जोडण्यात आला आहे. यामुळे नव्या प्रभागात जवळपास 75 ते 80 टक्के झोपडपट्ट्यांमधील मतदार असून उर्वरित मतदार झोपडपट्ट्यांमधील आणि दत्तवाडीसारख्या समिश्र वसाहतीमधील आहेत.

जागा राखण्याचे भाजपसमोर आव्हान

महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गतनिवडणुकीत मिळविलेल्या जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. त्यातच भाजप नगरसेवक शंकर पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते आगामी निवडणूक भाजपकडून लढणार की अन्य पक्षाकडून लढणार, हे स्पष्ट होण्यास काही कालावधी जाणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेकडूनही अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. त्यामुळे जनता वसाहत-दत्तवाडी प्रभागातील निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.

प्रभागातील इच्छुक उमेदवार

  • भाजप : आनंद रिठे, शंकर पवार (बदल होण्याची शक्यता), अनिता कदम, चंद्रकांत पोटे, जीवन माने, विनया बहुलीकर.
  • राष्ट्रवादी काँग्रेस : प्रिया गदादे, प्रेमराज गदादे, राम पालखे, विनायक हनमघर, अ‍ॅड. अभिजित बारवकर, प्रदीप शिवशरण, नितीन जाधव, नीलेश पवार.
  • काँग्रेस : प्रवीण चव्हाण, स्वाती शिंदे, दुर्गा शुक्रे, लक्ष्मी कांबळे, सुधीर काळे
  • शिवसेना : सुरज लोखंडे, प्रसाद चावरे, मोहन पासलकर, बाळासाहेब गरुड, अल्पना मोरे, वैशाली धारवटकर.
  • मनसे : राहुल तुपेरे, योगेश आढाव, नलिनी आढाव

प्रभागरचनेच्या सीमा

दांडेकर पूल चौक, सेनादत्त पोलिस चौकी, बालाजी मंदिर दत्तवाडी, विघ्नहर्ता मारुती नवग्रह, गाडगीळ रुग्णालय, नदीच्या बाजूने तपोभूमी सोसायटी, सरिताविहार अपार्टमेंट, नवशा मारुती मंदिर, पु. ल. देशपांडे उद्यान, बाल गणेश मित्रमंडळ, गणेश मंदिर, हिंदू मंदिर, तळजाई क्रीडांगण, वाघजाईदेवी मंदिर, पेशवे उद्यान, पर्वती मंदिर, जनता रुग्णालय, नेर्लेकर रुग्णालय, सहारा हॉस्पिटल, दांडेकर पूल, कॉलनी नर्सिंग होम.

प्रमुख झोपडपट्ट्या व सोसायट्या

जनता वसाहत (108 गल्ल्या), गणेशमळा, पानमळा वसाहत, दत्तवाडी, चुनाभट्टी, दांडेकर पूल, सरिताविहार सोसायटी, राजेंद्रनगर, पीएमसी कॉलनी, गोल्डन व्हील, रक्षालेखा सोसायटी, घरकुल, सीताबाग, अमरेंद्र, औदुंबर, अजमेरा, तपोभूमी, बँक ऑफ इंडिया, शिवप्रसाद, अनुबंध, चंद्रनील सोसायटी.

प्रभागाची मतदारसंख्या : 67 हजार 332
  • अनुसूचित जाती (एससी) प्रवर्ग : 14 हजार
  • अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्ग : 824

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news