दापोडी : पुढारी वृत्तसेवा : कला जोपासायला वयाचे बंधन नसते. याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो. दापोडी येथील दिगंबर एकनाथ शिंदे या 70 वर्षीय ज्येष्ठाने रांगोळीच्या माध्यमातून कलाकृती साकारण्याचा छंद जोपासला आहे.
सेवानिवृत्तीनंतर रांगोळी चित्रकला या विषयात स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांनी स्वातंच्याचा अमृतमहोत्सव याविषयावर रांगोळीतून सुंदर चित्र रेखाटले आहे.
2005 पासून वेगवेगळ्या विषयावर आजवर त्यांनी रांगोळीतून चित्रे साकारली आहेत. भ्रष्टाचार, संत दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, ऑलिम्पिक खेळाडू, साहित्यिकांचा मेळा, रामायण-महाभारत, भगवान विष्णूचे दशावतार आदी विषयावर यापूर्वी त्यांनी रांगोळी प्रदर्शने भरवली आहेत.
लालबहादूर शास्त्री, जय जवान जय किसान, इंदिरा गांधी, बांगलादेश मुक्ती करार, पी. व्ही. नरसिंहराव, मुक्त अर्थव्यवस्था व अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात घेतलेली अणुबाँब चाचणी, कारगिल युद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडिया, कलम 370, राम मंदिर, चांद्रयान मोहीम, अंतराळ यान कार्यक्रम आदी विषय रांगोळीतून रेखाटले आहे.
दापोडी येथील गणेश कॉर्नरच्या सोसायटीच्या कार्यालयातील फरशीवर ही रांगोळी साकारली आहे. सन 1976 ला सासवड येथील वाघेरे कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर 1981 साली भोसरी येथे एका खासगी कंपनीमध्ये स्टोअरमध्ये त्यांनी तीस वर्षे नोकरी केली.
2013 साली सेवानिवृत्तीनंतर सासवड, पुणे, पिंपरी चिंचवड, दापोडी, भोसरी परिसरात महोत्सवांमधून त्यांनी अनेक राजकीय सामाजिक, धार्मिक विषयावर रांगोळी व हलते देखावे केलेले आहेत.
"कोरोना काळातील लॉक डाऊनच्या काळातही घरातच विविध विषयावर रांगोळी साकारण्यात वेळ घालवला. रांगोळी काढून आनंदही मिळाला. या हस्तकलेचा उपयोग तरुणांनी करून घेतला पाहिजे. कलेला वय नसते, त्यातून निखळ आनंद मिळतो. मनुष्याने जीवनात छंद, कला जोपासायला हवी. या हस्तकलेच्या छंदासाठी मी पूर्णवेळ देऊ इच्छितो."
– दिगंबर शिंदे, दापोडी.
https://youtu.be/gUWZqZyNLD0