प्रसाद जगताप
पुणे : वाहन नोंदणीसह अन्य कामांमधून पुणे आरटीओला वर्षभरात तब्बल 1 हजार 27 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. राज्यात पुणे आरटीओला सर्वाधिक महसूल मिळाला असून, ते राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
वाहनांची नोंदणी करणे, वाहनांवरील बोझा चढविणे, उतरविणे, गाडी ट्रान्स्फर करणे, शिकाऊ आणि पक्का परवाना देणे, आंतरराष्ट्रीय परवाना देणे, कर बुडविणार्या वाहनांकडून कर वसूल करणे, नियमभंग करणार्या वाहनचालकांकडून दंड वसूल करणे, यांसारख्या कामांतून मिळालेल्या महसुलाचा यात समावेश आहे. राज्यात आरटीओची 52 कार्यालये आहेत. त्याअंतर्गत वाहनांसंदर्भातील विविध कामे चालत असतात. त्यातून परिवहन विभागाला महसूल मिळत असतो.
सन 2021 मधील महसुलाची आकडेवारी पाहता पुणे आरटीओला राज्यात सर्वाधिक महसूल मिळाला आहे. तर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय महसूल मिळविण्यात दुसर्या क्रमांकावर आहे. तिसर्या क्रमांकावर ठाणे आरटीओ कार्यालय, चौथ्या क्रमांकावर पश्चिम मुंबई आरटीओ कार्यालय आहे. तर पाचवा क्रमांक नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा लागत आहे. अनलॉकनंतर पुणे आरटीओतील सर्व कामे आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. आता तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र निर्बंधमुक्त केला आहे. त्यामुळे 2022 या वर्षात राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे.
परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना वायूपथकाच्या कारवाईसाठी एकूण 76 अत्याधुनिक गाड्या दिल्या आहेत. यात कारवाईसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळे महामार्गावरील कारवाई सोपी झाली आहे. या गाड्यांमध्ये स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अॅनेलायझर, टींट मीटर यांसारखी साधने सज्ज आहेत. त्यामुळे वाहनांवरील कारवाईस आणि थकीत कर वसुलीस वेग आला आहे.
नुकतीच सहायक मोटार वाहन निरीक्षकाची शासनाकडून परिवहन विभागात भरती करण्यात आली आहे. यातील काही मोटार वाहन निरीक्षक प्रशिक्षण घेत आहेत. तर काही प्रत्यक्षपणे कामकाज करीत आहेत. त्यामुळ वायूवेग पथकांमध्ये आता निरीक्षकांची भर पडली आहे.