पुणे : प्रत्येक इच्छुकाला लढण्याची संधी

पुणे : प्रत्येक इच्छुकाला लढण्याची संधी
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर

पुणे : महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक जागा सर्वसाधारण म्हणून खुली राहणार आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये आता महिलांची दोन आरक्षणे पडली, तरी अखेरच्या एका जागेवर कोणत्याही प्रवर्गातील प्रामुख्याने पुरुष इच्छुकांना निवडणूक लढण्याची संधी कायम राहणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत येत्या 31 मे रोजी जाहीर होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत निघणार आहे. महापालिकेच्या 58 प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी 23 जागा, तर अनुसूचित जमातीसाठी 2 अशा एकूण 25 जागा आरक्षित होणार आहेत. त्यामध्ये महिला आणि आरक्षित खुला याबरोबरच पन्नास टक्के महिला आरक्षण यानुसार सोडत निघणार आहे. त्यामध्ये जवळपास 29 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला येणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, ज्या प्रभागांमध्ये एससी आणि एसटी अशी आरक्षणे पडल्यानंतर त्यात दोन महिलांची आरक्षणे येणार का, त्यात किती प्रभागात सर्वसाधारण वर्गासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही, अशा पध्दतीचे प्रश्न इच्छुकांकडून उपस्थित केले जात आहेत.

याबाबत महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार 58 प्रभागांतील प्रत्येकी 1 जागा ही सर्वसाधारण वर्गासाठी खुली राहणार आहे. या जागेवर पुरुष, महिला अथवा कोणत्याही प्रवर्गातील इच्छुक निवडणूक लढवू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

असे असेल आरक्षण

महापालिकेच्या तीन सदस्यीय प्रभागात 'अ', 'ब' व 'क' अशा तीन जागा असणार आहेत. यात 'अ' ही जागा ज्या प्रभागात एससी प्रवर्गाचे आरक्षण असेल त्यासाठी आरक्षित होईल. तर, याच प्रभागातील 'ब' जागा महिला आरक्षित होईल. मात्र, शेवटी 'क' जागा ही सर्वसाधारण वर्गासाठी खुली होईल. ज्या प्रभागात एससी अथवा एसटीचे आरक्षण नाही त्यात 'अ'ची जागा महिला आरक्षित होईल, 'ब'ची जागा सोडतीवर दुसरी महिला आरक्षित होईल व 'क' खुली राहील. तर, काही प्रभागात 'ब' व 'क' या दोन्ही जागा सर्वसाधारण म्हणून खुल्या राहू शकतील. मात्र, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडेल, हे प्रत्यक्ष सोडतीवरच स्पष्ट होणार आहे.

प्रभाग क्र. 1 चा राजकीय तिढा सुटणार

महापालिकेच्या धानोरी-विश्रांतवाडी या प्रभाग क्र. 1 मध्ये एससी आणि एसटी अशी दोन आरक्षणे आहेत. त्यामुळे तिसर्‍या जागेवर महिला आरक्षण पडल्यास खुल्या वर्गाने आणि प्रामुख्याने पुरुष इच्छुकांनी काय करायचे, असा प्रश्न होता. मात्र, आता शेवटी एक जागा सर्वसाधारण म्हणून खुली राहणार असल्याने याठिकाणचा राजकीय तिढा सुटणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे आणि भाजपचे अनिल टिंगरे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news