नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला 16-0 अशी धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघाने 'सुपर-4' मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या दमदार विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप-2023 स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे.
आशिया चषकाच्या नॉकआऊट स्टेजमध्ये जागा मिळवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. भारतीय संघाने इंडोनेशियाला थेट 16-0 ने मात देत नॉकआऊट स्टेजमध्ये धडाक्यात एन्ट्री केली आहे. सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच दबदबा निर्माण केला होता. पहिल्या हाफमध्ये भारत 3-0 ने आघाडीवर होता. त्यानंतर दुसर्या हाफमध्ये 6-0 अशी मजल मारली. सामना संपला त्यावेळी भारताने 16-0 अशी इंडोनेशियाची दयनीय अवस्था केली आणि शानदार विजयाची नोंद केली.
आजच्या सामन्याचा परिणाम थेट 2023 मध्ये होणार्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेवरही झाला आहे. कारण मोठ्या फरकाने जिंकणारा संघ वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरणार होता. आता भारताने मोठ्या फरकाने विजयाची नोंद केल्यामुळे भारत वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र झाला आहे. पण पाकिस्तान संघ बाहेर फेकला गेला आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त जपान, कोरिया आणि मलेशिया देखील वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. तर पाकिस्तानचा पत्ता कट झाला आहे. आशिया चषकाचे बोलायचे झाले तर जपान आणि भारत नॉकआऊट स्टेजसाठी पात्र ठरले आहेत.