पुणे : मार्केटयार्ड, महर्षीनगर भागात आमचं ठरलंय… श्री. किंवा सौ.!

पुणे : मार्केटयार्ड, महर्षीनगर भागात आमचं ठरलंय… श्री. किंवा सौ.!

अनिल दाहोत्रे

पुणे : नवीन प्रभाग 39 (मार्केट यार्ड महर्षीनगर) मध्ये भाजपचे वर्चस्व असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसनेही लढत देण्याची जोरदार तयारी केली आहे. प्रभागातील आरक्षण निश्चित होताच निवडणुकीच्या रिंगणात श्री. का सौ. यापैकी कोणी उतरायचे, ते ठरवण्यात येणार असून, त्यापूर्वी इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीसुद्धा सुरू केल्या आहेत.

सर्व स्तरांतील मतदार

या प्रभागात चाळी, झोपडपट्टी व मध्यमवर्गीय सोसायटीसह, उच्चभ्रू सोसायटीमधील मतदार आहेत. झोपडपट्टीशी नाळ जुळलेला मतदार या भागातील लोकप्रतिनिधी ठरवत असतो. जुना प्रभाग 28 (सॅलिसबरी पार्क महर्षीनगर) मधील 45 टक्के व जुना प्रभाग 36 (मार्केट यार्ड लोअर इंदिरानगर) मधील 55 टक्के भाग मिळून हा नवीन प्रभाग 39 तयार झाला आहे. जुन्या दोन्ही प्रभागातून गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार एकतर्फी निवडून आले होते. मात्र, या वेळी परिस्थिती बदललेली आहे.

जातीय समिकरणेही महत्त्वाचे ठरणार

या प्रभागात इच्छुक उमेदवारांची मांदियाळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डझनभर इच्छुकांनी तयारी केल्याने उमेदवार ठरविण्याचे गणित मागील पंचवार्षिकप्रमाणे होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात जैन समाज जास्त असल्याने प्रत्येक पक्षाकडून जैन उमेदवार दिला जातो. किंबहुना त्या उमेदवारीमुळे संपूर्ण पॅनेलला एक गठ्ठा मतदान मिळू शकेल, असा अंदाज असतो. त्याच्या जोडीला झोपडपट्टी, वसाहती व चाळीमधून मतदारसुद्धा अपेक्षित उमेदवार निवडीसाठी कारणीभूत ठरतात.

भाजपकडून इच्छुकांमध्ये करण मिसाळ, मानसी देशपांडे, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, अनुसया चव्हाण, प्रियंका कांबळे, गणेश शेरला, ईश्वर वायल, प्रशांत दिवेकर, केतन क्षीरसागर, आशिष गोयल यांची नावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतोष नांगरे, नीलेश नवलाखा, बाळासाहेब अटल, राहुल गुंड, दिनेश खराडे, मृणालिनी वाणी, श्वेता होनराव, मोसिन काझी, लखन वाघमारे आदी प्रमुख इच्छुक आहेत. काँग्रेसकडून भरत सुराणा, पुष्कर अबनावे, विश्वास दिघे, कृष्णा सोनकांबळे, शर्वरी गोतरणे, स्मिता महाडिक, योगिता सुराणा, अनुसया गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत, तर शिवसेनेकडून श्रीकांत पुजारी, राजेंद्र शिळीमकर, रिषभ नानावटी आणि मनसेकडून सनी खरात, ललित तींडे हे इच्छुक आहेत.

स्थानिक नगरसेवक मुख्यत्वे झोपडपट्टी, वसाहती व चाळीमधील मतदारांसाठी आवश्यक त्या नागरी सुविधा देण्यात कमी पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. उच्चभ्रू सोसायटीच्या रंगरंगोटीवर पैशांचा चुराडा झालेला असल्याचे मध्यमवर्गीय मतदार बोलत आहेत. त्यामुळे यावेळी प्रभाग 39 मधून नगरसेवक निवडताना मतदार चौकसपणे मतदान करतील, अशी प्रभागात चर्चा आहे.

अशी आहे प्रभागरचना

स्वारगेट कॉर्नर, शंकरशेठ चौक कॉर्नर, गंगाधाम चौक कॉर्नरच्या आतील भागामध्ये सुजय गार्डन, कुमार पुरम, डीएसके चंद्रदीप, हेमकुंज सोसायटी, लक्ष्मीविलास, आदिनाथ, अरिहंत सोसायटी, ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, कुमार पार्क, पूर्णिमा टॉवर, टिमवि परिसर, हमालनगर, मीनाताई ठाकरे वसाहत, आंबेडकरनगर वसाहत, प्रेमनगर वसाहत, मुकुंद व महर्षीनगर भाग.

  • लोकसंख्या 59580
  • अनुसूचित जाती 10834

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news