पोटाला खाण्यासाठी बाहेर पडला आणि जीव गेला ! युक्रेनमध्ये कर्नाटकमधील विद्यार्थ्याचा करुण अंत

पोटाला खाण्यासाठी बाहेर पडला आणि जीव गेला ! युक्रेनमध्ये कर्नाटकमधील विद्यार्थ्याचा करुण अंत

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेनमधील लष्करी तणाव दिवसागणिक वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये घनघोर संघर्ष सहाव्या दिवशी कायम आहे. भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मोहीम सुरु असतानाच मोठा धक्का बसला आहे. उभय देशांच्या संघर्षात पहिला भारतीय बळी गेला आहे.

रशिया- युक्रेन युद्धात मंगळवारी नवीन शेखराप्पा ग्यानगौडर असे युद्धात बळी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. युक्रेनमध्ये तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. युक्रेन देशातील खारकिवमध्ये त्याचा करुण अंत झाला. नवीन मूळचा कर्नाटक राज्यातील हावेरी जिह्यातील रानेबेन्नुर तालुक्यातील चलकेरी गावचा रहिवासी आहे.

नवीन एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. तो खारकीव शहरातील गव्हर्नर बंगल्याच्या मागेच खासगी घरात राहत होता. सकाळी तो जवळच्या दुकानात भाजी आणि खाद्यपदार्थ आणण्यास गेला होता. तो सुमारे दोन तास रांगेत होता. त्यावेळी रशियन विमानांनी गव्हर्नर इमारत उडवून दिली. त्यात नवीन मारला गेला. नवीन याच्या भारतीय मित्रांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो कॉल एका ukrainian महिलेने स्वीकारला आणि सांगितले की नवीन ठार झाला असून त्याचा मृतदेह शवागारात नेण्यात आला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटद्वारे या माहितीला दुजोरा दिला. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने नवीन याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून ही माहिती दिली. नवीन याच्या भावाशी अधिकाऱ्यांचे बोलणे झाले.

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ऑपरेशन गंगा सुरु करण्यात आले, असले तरी अजूनही हजारोजण युक्रेनसह विविध सीमांवर अडकले आहेत.

रोमानियाच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना येण्यास सांगूनही अनेक जणांना मायदेशी परतता आलेलं नाही. कोसळत असलेल्या बर्फाखाली ते जीव मुठीत घेऊन मायभूमीत परतण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे ऑपरेशन गंगाला अधिक वेग देण्यासाठी भारतीय हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे.

युक्रेनमधील भारतीय नागरिकांना, बहुतेक विद्यार्थी, यांची सुटका करण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. आतापर्यंत, सहा फ्लाइट्समधून 1,396 भारतीय नागरिकांना युक्रेनमधून परत आणण्यात आले आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news