

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत घोषित निकाल पाहता मागील संचालक मंडळातील 7 संचालक पुन्हा निवडून आले आहेत, तर नव्याने निवडून आलेले 9 संचालक आहेत. त्यामुळे 'नव्याची नवलाई' अशीच चर्चा निवडणूक निकालानंतर ऐकावयास मिळत आहे.
या निवडणुकीतील संघावर आपल्याच नातेवाइकांची आणि घरातील मंडळीची वर्णी लावण्यातही आजी-माजी संचालक यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मावळत्या संचालक मंडळामधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब खिलारी, बाळासाहेब नेवाळे, भगवान पासलकर, केशरबाई पवार आणि अपक्ष दिलीप थोपटे हे 7 संचालक पुन्हा निवडून आलेले आहेत. सहकार पॅनेलमधील विजयी झालेल्या 9 संचालकांचा समावेश आहे. त्यामध्ये राहुल दिवेकर (दौंड), अरुण चांभारे (खेड), कालिदास गोपाळघरे (मुळशी), मारुती जगताप (पुरंदर), स्वप्नील ढमढेरे (शिरूर), चंद्रकांत भिंगारे (मुळशी), लता गोपाळे (खेड), भाऊ देवाडे (जुन्नर), निखील तांबे (शिरूर) यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवारांमध्ये चांभारे पूर्वी संचालक होते. मात्र, मागील संचालक मंडळात ते नव्हते. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांचा पराभव केला; तसेच माजी संचालक रामदास दिवेकर यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राहुल दिवेकर आणि बाळासाहेब ढमढेरे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा स्वप्नील ढमढेरे हे प्रथमच संघावर निवडून आले आहेत. मुळशीतून विजयी झालेले कालिदास गोपाळघरे यांच्या पत्नी वैशाली गोपाळघरे यांनी मागील संचालक मंडळात उपाध्यक्षपद भूषविले आहे. दरम्यान, जगताप, भिंगारे, गोपाळे, देवाडे हेसुद्धा प्रथमच संघावर निवडून आले आहेत. माजी संचालक जीवन तांबे प्रथमच निवडून आलेले निखिल तांबे यांचे चुलते आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकांमध्ये तरुण आणि नव्या चेहर्यांना संधी देण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी 'आमच्या तालुक्यातील उमेदवाराचा निर्णय आम्हांला घेऊ द्या', असा पवित्रा घेतला होता. त्यानुसार विद्यमान संचालक आणि नव्या चेहर्यांना काही ठिकाणी संधी मिळाली आहे. आमदारांचे म्हणणे उमेदवारांच्या विजयाने सार्थ ठरल्याची बाबही पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. मतदारांपर्यंत पोहोचून विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली मोर्चेबांधणी यशस्वी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अन्य निवडणुकांपेक्षा सहकारातील निवडणुका वेगळ्या ठरतात. देश आणि राज्याला सहकारातून समृद्धीकडे नेण्याचे काम माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही सहकारात असलेल्या चांगल्या कामाचा फायदा पक्षाला जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत झाला आहे. तुलनेने विरोधी पक्षाची जिल्ह्यात सहकारात ताकद नाही. त्यामुळे पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे