पुणे : इंदापूर तालुक्यात रंगलीय गण-गट रचनेची चर्चा

पुणे : इंदापूर तालुक्यात रंगलीय गण-गट रचनेची चर्चा

जावेद मुलाणी

इंदापूर : जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट व पंचायत समितीचे गण रचनेत बदल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन, तर पंचायत समितीच्या चार जागा वाढल्यामुळे इंदापूर तालुक्यातील गावागावांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गट- गणाचीच चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. थंडी कमी झाल्याने गावच्या पारावर, चौकात पेटणार्‍या शेकोट्या विझल्या आहेत. मात्र चौकाचौकात राजकीय चर्चेच्या उबेला दर्दी लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या गावाचा या गटामध्ये समावेश, हे गाव या गटातून कमी केले आहे. नवीन या नावाचा गट तयार केला असून त्यात याला उमेदवारी मिळणार आहे, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत. कामाला लागण्याचे आदेश प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याने सर्वच पक्षांमध्ये चैतन्य दिसून येत आहे. विद्यमान सदस्यांची या निवडणुकीत तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे.

काही सदस्यांचे नागरिकांच्या कामाबद्दलचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. तर काही विरोधक त्याचे भांडवल करून ते मुद्दाम समाजमाध्यमांवर टाकून समोरच्याने आपली कामे केली का हे नागरिकांना दाखवून देत आहेत. विद्यमान सदस्यदेखील आपण गेल्या पाच वर्षात किती निधी आणला हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तरीदेखील त्यांना वरिष्ठ धक्का देणार का यासाठी ते धास्तावलेले दिसून येत आहेत.

नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार का?

जिल्हा परिषद व पंचायत समितीला नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला हळूहळू वेग येत आहे. राष्ट्रवादीच्या गळाला अनेक जण लागल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सभांमधून सांगत आहेत, तर भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील आपल्या संपर्कात इतर पक्षातील कार्यकर्ते असल्याचे सांगताहेत. हे दोन्हीही आजी-माजी मंत्री '…आगे देखो होता है क्या!'असे म्हणत मनसुबे आखत आहेत.

इच्छुकांच्या पायाला भिंगरी

इंदापूर तालुक्यात बरेच नवीन चेहरे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांच्या पुढे पुढे करताना दिसत आहेत. प्रत्येक कार्यक्रमात व्यासपीठावर बसून आपण नेत्यांच्या नजरेसमोर राहून हा आपलाच कार्यकर्ता आहे असे भासवण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला गट वा गणात उमेदवारी मिळेल या आशेवर कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व भाजपच्या सभा कार्यक्रमांना गर्दी होत असून या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जागा कमी पडत आहे. युवकांसह वृद्धांची देखील गर्दी दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news