पुणे : फुरसुंगीत आघाडीपुढे भाजपचे आव्हान; बंडखोरही तयारीत

पुणे : फुरसुंगीत आघाडीपुढे भाजपचे आव्हान; बंडखोरही तयारीत
Published on
Updated on

विकास भागिवंत

फुरसुंगी : फुरसुंगी गावठाण भाग वगळून भेकराईनगर, गंगानगर, पापडेवस्ती, ढमाळवाडी पॉवर हाऊससह नवीन प्रभाग क्रमांक 45 ची निर्मिती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी झाली, तर आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक सोपी जाऊ शकते, असे वाटत असले, तरी भाजप उमेदवारांची सुरू असणारी तयारी आणि नाराजांची बंडखोरी झाली तर आघाडीची सगळी गणिते बिघडू शकतात.

पालिकेची 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर हद्दीलगतच्या 34 गावांपैकी 11 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. या गावातील रहिवाशांना पालिकेत प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी या 11 गावांचा मिळून प्रभाग 42 बनविण्यात येऊन 2019 साली या ठिकाणी दोन नगरसेवक पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये फुरसुंगीतील राष्ट्रवादीचे गणेश ढोरे व धायरीतील भाजपच्या अश्विनी पोकळे निवडून आले होते. आता मात्र फुरसुंगीचाच स्वतंत्र प्रभाग झाल्याने येथील इच्छुकांची संख्या वाढली आहे.

या प्रभागात प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. मात्र, आमदार संजय जगतापांमुळे काँग्रेस समर्थकांचीही ताकद वाढलेली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत या परिसरात अनेक लहान-मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. या ठिकाणी भाजपला चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढे भाजपचे उमेदवार तगडे आव्हान उभे करू शकतात.

स्थानिकांपेक्षा बाहेरच्यांचीसंख्या जास्त

स्थानिकांपेक्षा बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या रहिवाशांची संख्या प्रभागात जास्त आहे. त्यामुळे पक्षापेक्षा कोणता उमेदवार जवळचा आहे, या गोष्टीचा मतदारांकडून विचार होईल. या प्रभागातून राष्ट्रवादीकडून गणेश ढोरे यांच्यासह अमित हरपळे, अजिंक्य ढमाळ, प्रकाश शेवाळे, राजाभाऊ सूर्यवंशी, रमेश निवंगुणे, काँग्रेसकडून संजय हरपळे, सचिन हरपळे तर शिवसेनेकडून शंकर हरपळे, बाळासाहेब (पिंटू) हरपळे, राजाभाऊ होले, सविता ढवळे इच्छुक आहेत. भाजपकडून संतोष हरपळे, संदीप हरपळे, रणजित रासकर, डॉ. बाळासाहेब हरपळे हे मुख्य इच्छुक उमेदवार आहेत.

बंडखोरीची शक्यता वाढते आहे

पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास इतर पक्ष अथवा अपक्षही लढण्याची तयारी अनेक उमेदवारांनी ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी प्रभागरचनेत हस्तक्षेप करून प्रभागाची मोडतोड करीत शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे येथील जागावाटपातही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. कचरा डेपो बाधित असल्यामुळे येथील पाणी समस्या मुख्य समस्या असून, पालिकेने आकारलेला अवाजवी कर, अनधिकृत बांधकामे, कचरा, ड्रेनेज, ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण, अरुंद रस्ते, अपघात व वाहतूक कोंडी, या समस्यांबरोबरच पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्याने यांचा अभाव, वाढती गुन्हेगारी, हेच या प्रभागातील प्रचाराचे कळीचे मुद्दे राहणार आहेत.

अशी आहे प्रभागरचना

भेकराईनगर, तुकाईदर्शन, एकनाथपुरम सोसायटी, संकेतविहार, अष्टविनायक सोसायटी, एसपी इन्फोसिटी, गंगानगर, कुमार पार्क, त्रिमूर्तीविहार,शिक्षक कॉलनी, ढमाळवाडी, पापडेवस्ती, सुरेशनगर, हरपळे पार्क, पॉवर हाऊस, आशीर्वाद सोसायटी, वॉलनट स्कूल.

  • लोकसंख्या : 55957
  • अनुसूचित जाती : 6750
  • अनुसूचित जमाती : 649

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news