पुणे : आंबेगावला राष्ट्रवादी-शिवसेनेतच टक्कर

पुणे : आंबेगावला राष्ट्रवादी-शिवसेनेतच टक्कर
Published on
Updated on

संतोष वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविला गेला नाही तर राष्ट्रवादी-शिवसेनेत जोरदार लढत अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढवणार का, याबाबत स्पष्ट मत जाहीर केले नसल्याने इच्छुक संभ्रमात आहेत.

जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे 10 गण आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे 4 सदस्य, तर शिवसेनेचा एक आणि पंचायत समितीचे आठ सदस्य राष्ट्रवादीचे असून, शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. लवकरच होणार्‍या भीमाशंकर सहकारी कारखाना, बाजार समिती व इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू, परंतु तेथे शिवसेनेला सामावून घेतले पाहिजे, अशी भूमिका आढळराव पाटील यांनी घेतल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंचर नगरपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. नगरपंचायत होण्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुकांना शांत बसविले होते. त्यानंतर मात्र शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेकांचा शांत बसविण्याचा उद्रेक उफाळून आला असून, नगर पंचायतीची निवडणूक पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आम्ही निवडणुकीला उतरणार, अशी भूमिका घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे भविष्यात पक्षनेतृत्वाला पण बंडखोरांची मनधरणी करावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.

भाजप, काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी सुरू केलेली तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दखल घेण्याइतपत तरी नक्कीच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news