Pimpri News : अवैध ड्रोनच्या घिरट्या; पोलिस आयुक्तालय स्थापनेपासून एकही गुन्हा नाही

Pimpri News : अवैध ड्रोनच्या घिरट्या; पोलिस आयुक्तालय स्थापनेपासून एकही गुन्हा नाही
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : मागील काही महिन्यांपासून शहरावरील ड्रोनच्या घिरट्या वाढल्या आहेत. आकाशात उडणारे ड्रोन शासकीय आहे की खासगी, ड्रोन उडवण्याबाबत परवानगी घेतली आहे कर? हे तपासण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. ज्यामुळे अलीकडे खासगी ड्रोनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात नेहमी महत्त्वाच्या व्हीआयपी व्यक्तींचा दौरा असतो. आशावेळी पोलिस ड्रोनद्वारे पाहणी करतात. आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या देहूरोड येथे महत्त्वाच्या मिलिटरी आस्थापना आहेत. याव्यतिरिक्त शहरात महत्त्वाची मर्मस्थळे आणि वेगवेगळी शासकीय कार्यालये देखील आहेत. यातील काही शासकीय विभागांकडून कार्यालयांकडून ड्रोनचा वापर केला जतो.

मागील काही वर्षांपासून शासकीय कार्यालयाव्यतिरिक्त शाही विवाह सोहळे, मोठे समारंभ, राजकीय रॅली आदी ठिकाणी ड्रोनच्या सहायाने चित्रीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे. ड्रोनच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील फोटोग्राफर्सने मोठ्या प्रमाणात "ड्रोन" खरेदी केले आहेत. मात्र, ड्रोन उडवण्यासाठी लागणार्‍या पोलिसांच्या परवानगीबाबत संबंधित व्यवसायिक अनभिज्ञ आहेत. त्यांच्यातील व्यवसायिक स्पर्धेमुळे आकाशात उडणार्‍या ड्रोनची संख्या वाढू लागली आहे. याकडे खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

आयुक्तालय स्थापनेपासून एकही गुन्हा नाही

मागील काही वर्षांपासून आकाशात उडणार्‍या ड्रोनची संख्या वाढली आहे. खासगी कार्यक्रमानिमित्त कोणतीही परवानगी न घेता "ड्रोन" वापरण्याची संख्या लक्षणीय आहे, असे असली तरीही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अवैध ड्रोन वापरलेप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

ड्रोन उडवणे पडले महागात

आयएनएस शिवाजी हे लोणावळा येथे स्थित एक भारतीय नौदल अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या ठिकाणी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, एक खासगी ड्रोनचालक येथील प्रतिबंधित परिसरात ड्रोन शूटिंग करीत होता. याबाबत माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी संबंधित ड्रोनचालकावर गुन्हा दाखल करीत ड्रोन जप्त केल्याची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील अशा प्रकारे बेकायदा ड्रोन वापरणार्‍यावर कारवाई करण्याची गरज आहे.

दहशतवादाचे सावट

काही महिन्यांपूर्वी दापोडी येथून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. यापूर्वी देखील कासारवाडी, कुदळवाडी या भागातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. यातच अशा प्रकारे अवैधरित्या उडणारे "ड्रोन" धोकादायक ठरू शकतात.

अशी आहे परवानगीची प्रक्रिया

आकाशात 'ड्रोन' उडवण्यासाठी चिंचवड येथील पोलिस आयुक्तालय कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्ज संबंधित पोलिस स्टेशनला पाठवला जातो. स्थानिक पोलिस संपूर्ण चौकशीअंती अहवाल तयार करतात. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्फतीने अहवाल आयुक्त कार्यालयात पाठवला जातो. त्यानंतर अहवालाचे अवलोकन करून परवानगी द्यायची की नाही, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतात.

"ड्रोन" वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना "ड्रोन" वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई
करण्यात येईल.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, विशेष शाखा.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news