पुणे : पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षण संस्थांनी लैंगिकतेच्या आधारावर तृतीयपंथी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्यास किंवा टाळाटाळ केल्यास कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षण विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील अभ्यासक्रमासाठी तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबतच्या निर्देशांचे पालन करण्याची सूचनाही दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये तृतीयपंथी धोरणाच्या पालनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
केल्या आहेत.
उच्च शिक्षणात तृतीयपंथी विद्यार्थ्यांशी भेदभाव केला जाऊ नये, तृतीयपंथी समावेशक धोरण स्वीकारून लिंगभेद, लैंगिकतेच्या आधारावर होणारी उपेक्षा, अवहेलना, विलगीकरण अशा समस्यांचे निरसन करावे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी उपक्रम आयोजित करावेत, असे निर्देश दिले आहेत.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना समुपदेशन, करिअर संधी, शैक्षणिक सल्ला यांसह सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र समन्वय कक्ष किंवा समन्वयक नियुक्त करावा, वसतिगृहाची सुविधा उपलब्ध असलेल्या संस्थांनी तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवावा, तृतीयपंथी विद्यार्थ्यांबाबत पूर्वग्रह, भेदभाव, मानसिक छळवणूक, लैंगिक शोषण, हिंसा अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालयांनी देखरेख कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हेही वाचा