Onion market | ओतूर बाजारात कांदा गडगडला! कांदा उत्पादक हवालदिल | पुढारी

Onion market | ओतूर बाजारात कांदा गडगडला! कांदा उत्पादक हवालदिल

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची 29 हजार 269 इतक्या पिशव्यांची आवक झाली असली तरी बाजारभाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने व उत्तम प्रतीचा ओतूर कांदा या नावाने ओळख असलेला कांदा बाराच्याच भावात गेल्याने शेतकर्‍यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे.

अणे-माळशेज परिसरातील सुमारे 50 किलोमीटर अंतरातील ओतूर, रोहकडी, डुंबरवाडी, अहिनवेवाडी, सारणी पाचघर, आंबेगव्हाण, हिवरे, धोलवड, ठिकेकरवाडी खुर्द, खामुंडी, पिंपरी पेंढार, बेल्हे, अणे या भागात उत्तम प्रतीचा कांदा दरवर्षी उत्पादित केला जातो. हा कांदा ओतूर कांदा या नावाने राज्यात व राज्याबाहेर देखील ओळखला जात असून यंदा तुटपुंजे बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. रब्बी हंगामात इतर पिकांपेक्षा कांद्यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना कांदा पिकातून होती. मात्र, कांद्याला भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ओतूर उपबाजारात रविवारी (दि. 17) झालेल्या लिलावात गोळा कांद्याला प्रतिकिलो केवळ 12 रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती व्यवस्थापक मस्करे यांनी दिली आहे.या तुटपुंज्या भावात कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. कांद्याची प्रत उत्तम असली तरी दर नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे उत्पादकांचा पुरता वांदा झाल्याचे इतिहासात पाहायला मिळत आहे. शेतकर्‍यांना कांदा चाळीत साठवावा की विकावा हा प्रश्न पडला आहे.

भांडवली खर्च प्रतिकिलो 18 ते 20 रुपये

यंदा हवामानाने म्हणावी अशी कांद्याची फुगवण झाली नसल्याने कांदा उत्पादनात मोठी घटदेखील झाली आहे. त्यात बाजारभावही कमी आहेत. कांद्याचा भांडवली खर्च पाहता किलोला 18 ते 20 रुपये खर्च येतो. त्यामुळे कांदा पिकाबाबत ताळमेळ बसणे कठीण होऊन बसले आहे. म्हणावे असे दर मिळत नसतानाही पुढील भांडवलासाठी शेतकर्‍यांना नाईलाजास्तव कांद्याची विक्री करावी लागत आहे. शेतकर्‍याला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून सरकारला कांद्याबाबत केली जात आहे.

आळेफाटा येथे काही दिवसांपूर्वी कांदा 17 रुपये किलो होता. तो रविवारी 12 रुपये किलो इतका नीच्चांकी घसरला. पाच दिवसांत एका किलोला 5 रुपये भाव कमी झाला. असे जगात काय आर्थिक संकट आले आणि पाच दिवसांत किलोला 5 रुपये भाव घसरला?
संदीप गंभीर,

कार्याध्यक्ष, श्री काळभैरवनाथ देवस्थान खामुंडी

हेही वाचा

Back to top button