मत्स्य प्रकल्प ‘वेळवंडी’च्या मुळावर; ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचा विरोध | पुढारी

मत्स्य प्रकल्प ‘वेळवंडी’च्या मुळावर; ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचा विरोध

अर्जुन खोपडे

भोर : भाटघर धरण जलाशयात नव्याने उभारण्यात येत असलेल्या मत्स्य प्रकल्पामुळे वेळवंडी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या जलाशयात आधीच पाच प्रकल्प सुरू आहेत. यात या नव्या प्रकल्पाची भर पडल्याने भाटघर धरणातील पाणी दूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने या प्रकल्पास विरोध केला आहे. पाटबंधारे, महसूल विभागास याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. भोर तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या व वेळवंडी धरणाकाठी वसलेल्या बसरापूर गावात हा प्रकल्प उभारला जात आहे. या गावाला सुंदर नदी किनारा लाभल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. मत्स्य प्रकल्पामुळे त्यावर परिणाम होणार आहे.

भोर शहरासह, भाटघर, सांगवी, येवली, संगमनेर, माळवाडी, मळे-भुतोंडे खो-यातील गावे, भोलावडे, किवत व वेळवंड खो-यातील गावांना धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. परंतु, मागील चार-पाच वर्षापासून या नदीच्या पात्रात बड्या हस्तींचे मत्स्य व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यातच आणखी एका मोठ्या प्रकल्पाची भर पडली आहे. त्याचे काम जोरात सुरू आहे. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नदीकाठच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पाणी होणार दूषित

गेली चार वर्षांपासून धरणात व्यावसायिक पध्दतीने मत्स्यपालन होत आहे. नदी पात्रात छोटे छोटे पिंजरे लावले होते. मार्च महिन्यात काही बड्या व्यापा-यांनी रॉयल्टी भरून धरणात पिंजरा (केज) पध्दतीने मासे पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. मासे लवकर मोठे होण्यासाठी ज्या खाद्याचा वापर केला जातो ते खाद्य नैसर्गिक नसून कृत्रिम पध्दतीने तयार केले जाते. ते पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे न विरघळता पाण्यावर तरंगते. त्यामुळे पाणीसाठा दूषित होणार आहे. माशांचा वास पाण्याला येणार आहे. या प्रकल्पात वापरल्या जाणारे रसायनामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. हा व्यवसाय नद्यांना लागलेले ग्रहण असल्याचे जलतरणपटू सागर जाधव, निखिल बागडे, प्रमोद शेटे व योगेश गुठाळकर यांनी सांगितले.

देशी मासे संकटात

या मत्स्य व्यवसायात चिलापी माशाचे उत्पादन घेतले जाते. चिलापी मासा मासांहारी आहे. देशी, गावरान माशांचे बीज मोठ्या प्रमाणावर खातो. त्यामुळे देशी माशांची उत्पत्ती होत नाही. त्यामुळे रव, कटला, शिवडा, वाम, मरळ, कोळशी, कुरडी, लोळी, मळवे, वांजी, लाल परी,आंबळी, चालट आदी देशी माशांच्या प्रजातींवर परिणाम झाला आहे. स्थानिक मच्छिमारी व्यवसायावर त्यामुळे परिणाम झाला आहे.

हेही वाचा

Back to top button