

मंचर : पुढारी वृत्तसेवा : डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांतील शेतीला फायदा होणार आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहिरी, ओढे, नाल्यांत अत्यल्प पाणीसाठा आहे. पाणी कमी पडू लागल्याने परिसरातील पिके सुकू लागली होती. त्यामुळे धरणातून पाणी सोडावे अशी मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शेतकर्यांनी केली होती. वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यानंतर पाणी सोडण्यात आले. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अनेक गावांतील शेती बारमाही बागायती झाली आहे. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे परिसरातील पिके करपू लागली होती.
अनेक पाणी योजनाही पाणी कमी झाल्याने बंद होण्याच्या मार्गावर होत्या. शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी तसेच आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सहकारमंत्री वळसे पाटील यांच्याकडे डिंभे धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्यानंतर धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यामुळे सुटणार आहे.
या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन शेतकर्यांना करावे लागणार आहे. पुढील वर्षी जून महिन्यापर्यंतचा कालखंड अतिशय खडतर असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पाच ते सहा महिने पाण्याचे योग्य नियोजन सरकारला तसेच शेतकर्यांना करावे लागणार आहे. उन्हाळ्यामध्ये चार्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी जास्त प्रमाणावर चारा पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात पाण्याचे योग्य ते नियोजन शेतकर्यांना तसेच प्रशासनाला करावे लागणार आहे, असे कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर आणि दत्ता कोकणे यांनी सांगितले.
हेही वाचा :