Sunil Kedar : कारागृहात रवानगी होताच सुनील केदारांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल | पुढारी

Sunil Kedar : कारागृहात रवानगी होताच सुनील केदारांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना स्थानिक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. केदार यांना शुक्रवारी (दि.२३) रात्री उशिरा कारागृहाकडे रवाना केल्यानंतर अचानक तब्येत बिघडली. १५२ कोटींच्या जिल्हा मध्यवर्ती रोखे घोटाळ्यात ५ वर्षांची शिक्षा सूनावल्यानंतर त्यांच्यासह ६ आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना मध्यवर्ती कारागृहात रवाना केले होते.

केदार यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही

तब्बल 152 कोटींहून अधिक रकमेच्या बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होम ट्रेड घोटाळाप्रकरणी विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांना येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखरे-पूरकर यांच्या न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय विविध कलमांन्वये साडेबारा लाखांचा दंडही ठोठावला आहे.

विदर्भातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केदार यांच्यासह सहाजण दोषी असून, तीनजणांना दोषमुक्त करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन काळात पुढे गेलेला या खटल्याचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. याप्रकरणी केदार यांच्यासह अशोक चौधरी (तत्कालीन बँक व्यवस्थापक), केतन सेठ (मुख्य रोखे दलाल), सुबोध गुंडारे, नंदकिशोर त्रिवेदी, अमोल वर्मा यांनाही दोषी ठरविण्यात आलेे. मात्र, श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button