

संतोष वळसे पाटील
मंचर : गेल्या 7 वर्षांत जुन्नर वनपरिक्षेत्रातील मानव-बिबट संघर्षाचे चित्र अत्यंत भीषण बनले आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत 283 बिबट्यांचा मृत्यू झाला असून, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 52 जणांना जीव गमवावा लागला, 148 हून अधिक जखमी झाले आहेत. एकूणच जुन्नर वनपरिक्षेत्र भीतीच्या छायेखाली जगत आहे आणि या संघर्षाचा तोल कधी साधला जाईल, हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.(Latest Pune News)
मानवांप्रमाणेच गेल्या काही वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात वन्यप्राण्यांनाही जीव गमवावा लागला. हरिण, ससे आणि कोल्हे यासह अंदाजे सुमारे 67 वन्य प्राण्यांचे मृत्यू झाले, तर 34 जखमी झाले. वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे निवाऱ्याचा अभाव, अन्नटंचाई आणि मानवी वस्त्यांमध्ये वाढलेला हस्तक्षेप. ग््राामीण भागातील कचऱ्याचे खुले ढिगारे, गुरांचे शव टाकण्याची पद्धत आणि अनियंत्रित बांधकामामुळे बिबट्यांना मानवी वस्तीत यावे लागते. पूर्वी बिबटे जंगलात असायचे, आता गावात दिसतात. परिणामी माणूस आणि प्राणी दोघांचं जगणं असुरक्षित झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडे गस्तीसाठी असलेली वाहने डिझेलअभावी बंद पडत आहेत. काही ठिकाणी पिंजरे बसवले गेले असले, तरी नवीन पिंजरे खरेदीसाठी निधी नाही. रेस्क्यू टीमकडे रात्रीच्या गस्तीसाठी आवश्यक बॅटऱ्या व सुरक्षा साधनांची कमतरता आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबटे ठेवले असून, त्यावर गेल्या गेल्या काही वर्षांत अंदाजे सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये खर्च झाला आहे. परंतु या केंद्रात जागा अपुरी असल्यामुळे आणखी बिबटे ठेवणे कठीण झाले आहे. जनजागृतीसाठी केवळ काही शिबिरे घेण्यात आली, पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे वास्तव आहे.
मागील 25 वर्षांत जुन्नर वन विभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यात नुकसानभरपाईपोटी 5.82 कोटी, तसेच पशुधन नुकसानभरपाईपोटी 20.92 कोटी आणि पीक नुकसानभरपाईपोटी 66.25 लाख रुपये देण्यात आले आहेत. या घटनांमुळे ग््राामीण भागात सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर गावांमध्ये शुकशुकाट पसरतो. शेतकरी, महिला आणि विद्यार्थी घराबाहेर पडणे टाळतात. शेतीकामे आणि दूध संकलन यावर देखील गंभीर परिणाम झाला आहे. बिबट्यांच्या उपस्थितीची नोंद केवळ गावपातळीवरच नाही, तर रस्त्यालगत, शेतशिवारात आणि घरांच्या आवारातदेखील होत आहे.
जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत; मात्र भरपाईसाठी महिनोनमहिने फेऱ्या माराव्या लागतात, याकडे वन विभागाने गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
श्याम गुंजाळ, उद्योजक, लांडेवाडी
गावात पिंजरा आला तरी त्यात बिबटे अडकत नाहीत. लोकांची भीती मात्र दिवसेंदिवस वाढते आहे.
अनिल वाळुंज, माजी सरपंच, पोदेवाडी