पुणे: प्रवाशांच्या मनात घर करून राहिलेल्या आणि एकेकाळी ‘एशियाड’ नावाने ओळखल्या जाणार्या, सध्या हिरकणी म्हणून धावणार्या निमआराम बस आता पुन्हा त्यांच्या मूळ हिरव्या आणि पांढर्या रंगांत परत येणार आहेत. मध्यंतरीच्या काळात गुलाबी आणि पांढर्या रंगांत दिसणार्या या बसगाड्या आता त्यांच्या मूळ अवतारात परतणार आहेत.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व एसटी कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. यानुसार, सध्या गुलाबी-पांढर्या रंगात धावणार्या हिरकणी बसगाड्यांना हिरवा आणि पांढरा रंग देण्यास सुरुवात झाली आहे. बारामती विभागीय कार्यशाळेत रंग देऊन तयार केलेली एक बस पूर्वीच्याच रंगात दिसणार आहे. (Latest Pune News)
हिरकणीचा इतिहास : एशियाड ते हिरकणी
एशियाड 1982 - दिल्ली येथे 1982 साली आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची ने-आण करण्यासाठी एसटीने स्वतःच्या कार्यशाळेत 200 आरामबसची निर्मिती केली. स्पर्धेच्या समाप्तीनंतर यापैकी 50 बसेस एसटीने विकत घेतल्या आणि दादर-पुणे या मार्गावर एशियाड ब्रँड खाली चालवण्यात आल्या. एशियन गेम्स या नावावरूनच एशियाड हे नामकरण केलेल्या या बसनी प्रवाशांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले.
पुशबॅक हिरकणी - 2015 :- 8 मार्च 2013 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निमआराम/एशियाड बसचे ’हिरकणी’ असे नामकरण करण्यात आले. सर्व शहरे जोडणारा आरामदायक प्रवास अशी ’हिरकणी’ बसची ख्याती असून, सध्या एस.टी.च्या ताफ्यात हिरव्या-पांढर्या रंगाच्या हिरकणी बस गुलाबी-पांढर्या रंगात उपलब्ध आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक होण्यासाठी या बस एअर सस्पेन्शनयुक्त आहेत.
सध्या हिरकणी नावाने ज्या बस आहेत. त्यापूर्वी ’एशियाड’ नावाने ओळखल्या जायच्या. त्या बसची विशिष्ट रंगसंगती लोकांना आवडत होती. त्यामुळे लोकभावनेचा विचार करून, यापुढे हिरकणीला पूर्वीप्रमाणे रंगसंगती देण्यात येत आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, म. राज्य तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
मध्यवर्ती कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झालेल्या सूचनेनुसार आम्ही सध्या गुलाबी रंगात धावत असलेल्या हिरकणी बसचा रंग पूर्वीप्रमाणेच हिरवा, पांढरा करत आहोत. पूर्वी या बसची हीच ओळख होती, ती पुन्हा प्रवाशांना त्याच रंगात दिसणार आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग