

पुणे: शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांची वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा विद्यार्थ्यांना 52 रविवार वगळून वर्षभरात एकूण 76 सुट्या असणार आहेत. यामध्ये दिवाळीच्या 10 दिवस (दि. 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस (दि. 2 मे ते 13 जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत. अशा सर्व मिळून वर्षभरात 128 दिवस सुट्या आहेत.
गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यादीतील तारखेला तो सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुटी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने गटशिक्षणाधिकार्यांची पूर्वमान्यता घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे. (Latest Pune News)
मुख्याध्यापक अधिकारात सुटी घेताना संबंधित मुख्याध्यापकांनी तीन दिवस अगोदर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांकडे लेखी कळविणे बंधनकारक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे.
अर्ध्यावेळेची शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरेल असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी 60 मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसर्या सत्रात 10 मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि 35 मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.
वर्षभरातील सार्वजनिक सुट्या
जुलै: आषाढी एकादशी, मोहरम, नागपंचमी (2 दिवस)
ऑगस्ट: रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी (3 दिवस)
सप्टेंबर: गौरी विसर्जन, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना (4 दिवस)
ऑक्टोबर: गांधी जयंती (दसरा) व दिवाळी सुट्टी (11 दिवस)
नोव्हेंबर: गुरूनानक जयंती (1 दिवस)
डिसेंबर: ख्रिसमस - नाताळ (1 दिवस)
जानेवारी: मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन (3 दिवस)
फेब्रुवारी : शब-ए-बारात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंत(3 दिवस)
मार्च: धूलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती (6 दिवस)
एप्रिल: गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (2 दिवस)
मे: महाराष्ट्र दिन, उन्हाळी सुटी (27 दिवस)
जून: उन्हाळी सुटी : (12 दिवस)
जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील सुटी: (2 दिवस)
संपूर्ण वर्षभरातील 52 रविवार