

पुणे: दहावीनंतरच्या कला पदविका अभ्यासक्रमासाठी कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कला पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश संख्या वाढविण्याच्या द़ृष्टीने ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा दिलेली आहे, अशा दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कला पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेण्यासाठी 1 लाख 20 हजार 741 विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आलेला आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (Latest Pune News)
शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता 1 वर्ष, 2 वर्षे व 3 वर्षे कालावधीच्या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम शासकीय, शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित कला संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे या प्रक्रियेच्या माहितीसाठी सूचना दि. 6 जून 2025 रोजीच प्रसिध्द करण्यात आली आहे.
त्यानुसार, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 जून होती. परंतु काही विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्याबाबत विचारणा झाल्यानंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सुधारित करण्यात आले आहे. आता विद्यार्थी 5 जुलै 2025 पर्यंत आर्ज सादर करू शकतात.
या प्रवेशाची पहिली तात्पुरती निवड यादी 8 जुलै 2025 रोजी प्रकाशित केली जाणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास त्यांना त्यांच्या लॉगिनमधून 9 जुलै पर्यंत तक्रार सादर करणे आवश्यक असेल. उमेदवारांसाठी पहिली निवड यादी 14 जुलै रोजी प्रसिद्ध होईल आणि संबधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना 15 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.