पिंपरी : पिंपरीपासून पुण्यातील सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. तर, पुण्यातील गरवारे कॉलेज ते रुबी हॉलदरम्यानदेखील मेट्रोचा मार्ग सुरू झाला आहे. दरम्यान, पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर अशा प्रकारे मेट्रो मार्गिकेची उभारणी सुरू आहे. सध्या हे काम तीन टप्प्यात सुरू असून 40 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, सर्व काम पूर्ण होण्यासाठी मार्च 2025 उजाडणार आहे.
हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडी येथील कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून ये-जा करणारे आयटी अभियंते, कर्मचारी यांचा प्रवास सुखकर होणार आहे. पर्यायाने, ही मेट्रो सुरू होणे गरजेचे आहे.
महामेट्रोच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात पिंपरी ते फुगेवाडी असा मार्ग सुरू करण्यात आला. तर, वनाज ते गरवारे महाविद्यालय असा मार्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, दुसर्या टप्प्यात फुगेवाडीपासून पुणे येथील सिव्हिल कोर्टपर्यंत तर, गरवारे महाविद्यालयापासून रुबी हॉल क्लिनिकपर्यंत मेट्रो सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला त्याचे लोकार्पण करण्यात आले.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेच्या कामाला 25 नोव्हेंबर 2021 पासून सुरुवात झाली. माण ते वाकड, वाकड ते बाणेर, सकाळनगर ते सिव्हिल कोर्ट असा हा मार्ग असणार आहे. तिन्ही टप्प्यात हे काम सध्या वेगाने सुरू आहे. ताथवडे येथे मेट्रोसाठी आवश्यक व्हायाडक्ट सेगमेंट कास्टिंगचे काम केले जात आहे. प्रत्येकी 3 मीटरचे सेगमेंट कास्टींग आहे. एका सेगमेंटचे वजन 45 टन इतके आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर केले जात आहे. 2017 च्या मेट्रो धोरणानंतर पीपीपी तत्त्वावर होणारा हा मेट्रोचा पहिलाच प्रकल्प आहे. मेट्रो मार्गिकेसाठी जुलै अखेरपर्यंत 455 खांबांची उभारणी केली आहे. तर, मेट्रो स्थानकांसाठी 204 खांब उभारले आहेत.
– रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.
हेही वाचा