म्हसोबाचीवाडी दुर्घटनेतील कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्त | पुढारी

म्हसोबाचीवाडी दुर्घटनेतील कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्त

वालचंदनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांच्या आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्त केले. बेलवाडी (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.११) म्हसोबाचीवाडी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या घरी जाऊन आमदार भरणे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्त केले.

मागच्या आठवड्यात म्हसोबाची वाडी येथे विहिरीला संरक्षक भिंत बांधत असताना भिंत ढासळून झालेल्या दुर्घटनेत बेलवाडी येथील सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलानी, परशुराम बन्सीलाल चव्हाण व मनोज उर्फ लक्ष्मण मारुती सावंत या चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या सर्व मृत कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आमदार भरणे यांनी तातडीने या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा केली होती.

शुक्रवारी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार भरणे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांना मदतीचे धनादेश देऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व घरकुल योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. घटनेला एक आठवडा पूर्ण होताच आमदार भरणे यांच्या पाठपुराव्यामूळे शासनाकडून दुर्घटनेतील कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.तर आर्थिक मदतीचे धनादेश स्वीकारत असताना कामगारांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रतापराव पाटील, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपतीचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर,पंकज जामदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

नगर : अधिकारी नवे, वेबवर कारभारी मात्र जुने

अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ

अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ

Back to top button