पुणे : आनंदधारा ! नागरिक सुखावले ; लवासा भागात अतिवृष्टीची नोंद

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मंगळवारी शहरात मनसोक्त पाऊस बरसला. वार्‍याचा वेग कमी असल्याने विजांचा कडकडाट नव्हता, त्यामुळे पहाटेपासूनच शहरावर हळूवार वेगाने आनंदधारा सुरू झाल्या. काही मिनिटांची विश्रांती घेत तो पहाटे सहा ते रात्री उशिरापर्यंत बरसत होता. या भिजपावसाने बहार आणली. आर्द्रता 98 ते 100 टक्क्यांवर गेल्याने थंडी वाढली. दिवसभरात शहरात सरासरी 14 मि. मी. पावसाची नोंद झाली. लवासा भागात अतिवृष्टीची नोंद झाली. तेथे 70 मि. मी. पावसाची नोंद झाली.

मान्सून शहरावर जोरदार बरसण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी दिवस उजाडला तो संततधार पावसाने. पाऊस सुरू असल्याने लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या पालकांची धांदल उडाली. स्वेटर, छत्री, रेनकोट बाहेर काढावे लागले. सकाळी सात वाजता पावसाने क्षणभर विश्रांती घेतली. पण, पुन्हा तो एकाच वेगाने संततधार बरसत राहिला. त्यामुळे चाकरमानी वर्गाला कार्यालयात जाताना रेनकोट घालूनच बाहेर पडावे लागले. शहरात सर्व पेठांसह उपनगरांत भिजपाऊस सुरू होता. शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. स्वारगेट परिसर, शिवाजीनगर, कोथरूड, गुरुवार पेठ या भागांत सखल भागात पाणी साचले होते. सततच्या पावसाने रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती.

आजही मुसळधारेचा इशारा..
पुणे वेधाशाळेने बुधावारीही शहरात मुसळधार पावसचा अंदाज दिला असून, घाटमाथ्याला अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) इशारा दिला आहे.

आर्द्रता 100 टक्क्यांवर, थंडी वाढली
शहरातील आर्द्रता 98 ते 100 टक्क्यांवर गेल्याने शहरातील वातावरण बदलून गेले. कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमान 28 तर किमान 22 अंशांवर खाली आल्याने गारठा वाढला, त्यामुळे रेनकोटसह नागरिकांनी स्वेटर, जॅकेटसह इतर गरम कपडे घालूनच बाहेर पडणे पसंत केले.

रस्त्यांची झाली तळी, नागरिकांची तारांबळ
मंगळवारच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाट काढणे कठीण झाले होते. लॉ कॉलेज रस्ता, शिवाजी रस्ता भागातील दगडूशेठ गणपतीजवळ पाणी साचल्याने तेथे वाहतूक कोंडी झाली होती. बुधवार पेठ भागात सायंकाळी रस्त्यांना जणू पूर आला होता.

मान्सूनचा जोर वाढल्याने शहरात आगामी पाच दिवस असाच पाऊस राहील. प्रमुख्याने घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता 30 जूनपर्यंत असल्याने घाटमाथ्यावर फिरायला जाताना सावधान राहावे.
                             – अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा 

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news