Haveli Zilla Parishad Election Pune: हवेलीत जिल्हा परिषदेला भाजप-राष्ट्रवादीत चुरस वाढणार !
जयदीप जाधव
उरुळी कांचन : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी या दोन पक्षांत हालचाली गतिमान झाल्या आहेत. हवेली तालुक्यात जिल्हा परिषद गटांची संख्या कमी झाल्याने सर्वसाधारण अध्यक्षपदाच्या शर्यतीत निराशा झाली आहे; मात्र हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची जागा खुली झाल्याने तालुक्यात सत्ताधारी पक्षांमध्ये स्पर्धा तीव झाली आहे.(Latest Pune News)
जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात शहरालगतचा तालुका असल्याने लोकसंख्येच्या आधाराने हवेली तालुक्याची जिल्हा परिषदेची गट संख्या सर्वाधिक होती. त्यावेळी तालुक्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग््रेासचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावाने राष्ट्रवादीकडे राहिल्या आहेत. मात्र आता भाजपने शहर तसेच उपनगर भागात आपले अस्तित्व निर्माण केल्याने हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 गणांमध्ये चुरस वाढली आहे. अशातच दोन्ही महत्त्वाच्या पदांची आरक्षणे खुल्या प्रवर्गास झाल्याने सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीत हालचाली गतिमान झाल्या आहेत.
हवेली तालुक्यातील दोन्ही सहकारी संस्था असलेल्या पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या महत्त्वाच्या संस्थांवर संचालक मंडळाची वर्णी लागल्याने काही प्रमाणात इच्छुकांची संख्या कमी झाली आहे; मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘आमदारकीची’ मनिषा बाळगून तयार असलेले अनेक मान्यवर मिनी विधानसभेची तयारी म्हणून निवडणुकीकडे बघू लागले आहेत. परिणामी जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीतच स्पर्धा सुरू झाली आहे.
पर्यटन व देवदर्शन वाढले
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन सहली तसेच देवदर्शन सहलींची खास मेजवानी ठेवली आहे. अगदी अयोध्या, बनारस, उज्जैन तसेच राज्यातील तुळजापूर, अक्कलकोट अशा सहली सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे या तालेवार इच्छुकांकडे मतदारदेखील आपली हौस भागवून घेण्याच्या तयारीत असून, तालेवार उमेदवार मतदार शोधत आहेत.

