

खडकवासला: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक वातावरणात पार पडण्यासाठी हवेली तालुका निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यात विविध गटांसाठी विशेष मतदान केंद्रांची स्थापना केली आहे. यामुळे मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि उत्साहवर्धक होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या नियोजनातून ही प्रक्रिया राबवली जात आहे.
महिला (गुलाबी) मतदान केंद्र: लोणी काळभोर
महिला मतदारांना सुरक्षित आणि प्रोत्साहनपर वातावरण मिळावे, यासाठी लोणी काळभोरमध्ये ‘पिंक बूथ’ची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या केंद्राचे संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापन महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे असणार आहे.
आदर्श मतदान केंद्र: उरुळी कांचन
स्थानिक संस्कृती आणि वैशिष्ट्यांची झलक दाखवणारे हे केंद्र उरुळी कांचनमध्ये असेल. मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह वाढवण्यासाठी या केंद्राची मांडणी अत्यंत आकर्षक आणि सांस्कृतिक बाबींचा विचार करून केली जाणार आहे.
पडदानशीन मतदान केंद्र: खेड शिवापूर
ज्या महिला पारंपरिक पद्धतींचे पालन करतात, त्यांच्यासाठी खेड शिवापूरमध्ये गोपनीय व सुरक्षित वातावरणात मतदानाची विशेष सोय करण्यात आली आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मनुष्यबळ कक्षाचे नोडल अधिकारी प्रमोद भांड यांच्यासह साहीर सय्यद, धम्मदीप सातकर, भूमेश मसराम व त्यांच्या टीमने या केंद्रांच्या नियोजनाची माहिती दिली. निवडणूक अधिक समावेशक आणि पारदर्शक करण्यासाठी या विशेष केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास डॉ. यशवंत माने यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे ग््राामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा माध्यम कक्षाचे प्रा. योगेश हांडगे यांनी व्यक्त केली आहे.