पुणे; पुढारी वृत्तसेवा : परदेशी राहणार्या नातेवाइकांना फराळ पाठवायचा असेल तर तो नक्कीच पाठवता येईल…कारण महिला व्यावसायिकांकडून वैविध्यपूर्ण फराळ तयार करण्यास सुरुवात झाली असून, त्यांच्याकडे फराळासाठी ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पुणेकरांकडून मागणी सुरू झाली आहे. फराळाचा बॉक्स असो वा फराळाचे पॅकेट… महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या घरगुती फराळाला आतापासूनच चांगला प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे या महिला व्यावसायिक फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह दूरध्वनीद्वारेही ऑर्डर घेत आहेत. अंदाजे साडेसात हजार महिला व्यावसायिक यंदा व्यवसायात उतरल्या आहेत.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या सणासाठी आतापासून फराळ खरेदीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला व्यावसायिकांनी फराळासाठीची तयारी सुरू केली आहे. महिला व्यावसायिकांसह त्यांचे कुटुंबीय आणि महिला कर्मचारीही त्यांना फराळ बनविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. घरगुती चव, कमी तेलात वापरून केलेले पदार्थ आणि स्वच्छता या कारणांस्तव घरगुती फराळाला यंदाही प्रतिसाद आहे. साधारणपणे एक किलोपुढील फराळ खरेदी केला जात आहे.
महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, 'महिला व्यावसायिकांनी घरगुती फराळ तयार करण्यास सुरुवात केली असून, आता परदेशात राहणार्या मराठी भाषकांसाठी फराळाचा बॉक्स कुरिअरद्वारे पाठवला जात आहे. विविध ठिकाणांहून ऑर्डर येत आहे. मिक्स बॅाक्सला यंदा मागणी आहे.' महिला व्यावयासिक गायत्री पटवर्धन म्हणाल्या, 'यंदा फराळासाठी ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात केली. चकली, शंकरपाळे, शेव, चिवडा असा फराळ तयार करत आहोत. यंदा फराळाची किंमत 10 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे.'
आताच्या घडीला हळूहळू फराळासाठी ऑर्डर येत आहेत. आम्ही सोशल मीडियाद्वारे ऑर्डर घेत आहोत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑर्डर घेत आहोत. परदेशातील फराळासाठीच्या ऑर्डर आता आम्ही पूर्ण करत आहोत. 1 तारखेनंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणांहून आलेल्या फराळाच्या ऑर्डरला सुरुवात होईल.
– सुजाता कोतवाल, महिला व्यावसायिक
हेही वाचा