Hadapsar Water Shortage: हडपसर परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; ५० हजार लोकसंख्येला केवळ ३ लाख लिटर पाणी

दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज; खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ, पाणीपुरवठा न वाढवल्यास महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

हडपसर: हडपसर परिसरातील साडेसतरानळी येथे पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला महापालिकेकडून दररोज केवळ तीन लाख लिटर पाणीपुरवठा केला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असताना अत्यल्प पाणी मिळत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Water Supply
Pune Fort Making Competition: पुण्यात बालचमूंच्या हातून साकारताहेत शिवकालीन गडकिल्ले; ३२ व्या किल्ले स्पर्धेची लगबग

महापालिका कर व पाणीपट्टी नियमित वसूल करते; मात्र मूलभूत सुविधा देताना दुजाभाव का? असा सवाल साडेसतरानळी नागरिक कृती समितीने उपस्थित केला आहे. साडेसतरानळी गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून नागरिक नियमितपणे कर भरत आहेत. मात्र, अद्यापही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पुरेसा साठा होत नसल्याने दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. महापालिकेकडून पाणीपट्टी वसूल केली जात असताना नागरिकांना खासगी टँकरचे पैसे मोजावे लागत असल्याने नाराजी वाढली आहे.

Water Supply
Hinjewadi Traffic Congestion: हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? सहा डीपी रस्त्यांचे काम डिसेंबरपासून सुरू होणार

सध्याची परिस्थिती लक्षात घेता गावाला तातडीने किमान २० ते २५ लाख लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचे नियोजन होईपर्यंत महापालिकेने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समितीने केली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल तुपे, शैलेश शेलार पाटील, सागर कडू देशमुख, शांताराम बेलदार, हनुमंत वाबळे, सुनील माने, दीपक देवकर, सतीश वाघमारे, रामभाऊ साठे, सचिन कोकरे, दिलीप काळे, तुकाराम कुदळे, विलास तुपे आदींनी पुढाकार घेतला आहे.

Water Supply
Pune Dowry Harassment Case: पुण्यात पुन्हा एक हुंडाबळी; प्रसिध्द व्यावसायिकेच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

लोकसंख्येच्या तुलनेनुसार पाणी कोटा वाढवा

पुणे शहराच्या इतर भागांप्रमाणे साडेसतरानळी गावालाही समान आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठ्यात तातडीने वाढ करणे आवश्यक आहे. शहरातील इतर भागांना नियमित पाणी मिळत असताना साडेसतरानळीच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे योग्य नाही. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावाला नियमित, समान आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी साडेसतरानळी नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Water Supply
Pune District Court Bomb Threat: पुणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; पाच तास तपासणी, न्यायालयीन कामकाज ठप्प

महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा

साडेसतरानळीला इतर भागांप्रमाणे समान आणि पुरेसा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी नागरिक कृती समितीने केली आहे. सध्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यात वाढ करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.