

पुणे: आईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील काळेपडळ परिसरात समोर आला आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाब आणि धमकीमुळे हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गणेश संजू बिरादार (वय 25, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करून तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत असलेला प्रियकर हा सराइत गुन्हेगार आहे. दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय 21, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय 21, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभि उर्फ अभि संजय इंगळे (वय 22), सूरज रमेश दोरकर (वय 21), साहिल सागर शेलार (वय 24, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय 20, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली.
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. दुर्वांग याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, तर गणेश याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाव आणला होता. त्याने तरुणीच्या आईला याबाबतची माहिती दिली होती. या कारणावरून दुर्वांग आणि गणेश यांच्यात तीन महिन्यांपूर्वी वाद झाले होते.
3 मे रोजी हडपसरमधील ससाणेनगर भागात असलेल्या इमारतीच्या परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश थांबला होता. त्या वेळी आरोपी दुर्वांग आणि साथीदार तेथे आले. त्यांनी गणेश याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. गणेश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. पसार झालेल्या आरोपींना सापळा लावून वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे, हवालदार प्रवीण काळभोर, नीलेश देसाई, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, राकेश साळुंके, अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.