Guru Purnima Marathi Artists: गुरूंच्या संस्कारातून घडले कलाकार; गुरुपौर्णिमेनिमित्त मान्यवरांनी व्यक्त केली कृतज्ञता

आई-वडील, शिक्षक, दिग्दर्शक आणि मार्गदर्शकांचे ऋण मान्य; कलेच्या प्रवासातील गुरूंचे महत्त्व कलाकारांनी उलगडले
Marathi Artists
Marathi ArtistsPudhari
Published on
Updated on

पुणे: कलाकारांच्या आयुष्यात प्रतिभेला जितके महत्त्व आहे, तितकेच योग्य गुरूंच्या मार्गदर्शनालाही आहे. रंगभूमी, संगीत, चित्रपट किंवा मालिका अशा कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी गुरूंनी दिलेले मार्गदर्शन, शिस्त आणि संस्कार महत्त्वाचे ठरतात.

Marathi Artists
Pune Parvati Hill Road: पावसाच्या तडाख्यात पुण्याची पर्वती टेकडी; पर्यटकांचा मार्ग झाला धोकादायक

बुधवारी (दि. २९) साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त दै. 'पुढारी'शी संवाद साधताना विविध क्षेत्रांतील कलाकारांनी आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आई-वडिलांपासून शिक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि जीवनातील प्रत्येक अनुभवानेच आपल्याला घडविल्याच्या भावना व्यक्त केल्या आणि गुरूंचे आयुष्यातील महत्त्वही उलगडले.

Marathi Artists
Pune Zilla Parishad Meeting: योजनांची माहिती वेळेवर द्या; पुणे जिल्हा परिषद सभेत प्रशासनाला सदस्यांचा जाब

गार्गी फुले (अभिनेत्री): आई-वडील हेच पहिले गुरू आहेत. वडील निळू फुले यांच्याकडून माणुसकीचे संस्कार, तर आईकडून संगीताची जाण आणि ऐकण्याचा कान मिळाला. सत्यदेव दुबे आणि प्रसाद वनारसे यांनी अभिनयाची दृष्टी दिली. आजही प्रत्येक माणूस गुरूसारखाच वाटतो. चांगला-वाईट प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. त्यामुळे प्रत्येक अनुभव हा गुरूच असतो.

आनंद भाटे (गायक): बालपणी चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून संगीताचे धडे सुरू झाले. त्यानंतर यशवंतबुवा मराठे यांनी शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम केला. पुढे पंडित भीमसेन जोशी यांच्या सान्निध्यात दोन दशकांहून अधिक काळ शिकण्याची संधी लाभली. त्यांच्या सहवासातून केवळ गायन नव्हे, तर साधना, समर्पण आणि कलेप्रती निष्ठाही शिकायला मिळाली. माझ्या आयुष्यात गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे.

Marathi Artists
Pune Municipal Corporation Security: पुणे महापालिकेची सुरक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर; ३९८ कायमस्वरूपी पदे रिक्त

सौरभ गोखले (अभिनेते): गुरू म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी गुरू आहे. रोहित शेट्टी, विजय केंकरे, वीरेंद्र प्रधान, राकेश सारंग, कुमार सोहनी, प्रताप फड यांसारख्या दिग्दर्शकांनी आणि प्रसाद भेंडे, योगेश कोळी यांसारख्या सिनेमॅटोग्राफर्सनी कॅमेऱ्यासमोर काय करावे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे काय करू नये, याचे मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षकांनीही माझ्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. पडद्यामागील कलाकारांकडून मिळालेल्या सूचनाही माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. माझे आई-वडील आणि मित्रांनीही योग्य वेळी दिलेले मार्गदर्शन मला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देत राहिले.

गिरीश परदेशी (अभिनेते): कलाकार म्हणून घडत असताना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेक गुरूंचे मार्गदर्शन लाभले. नाट्यप्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या कार्यशाळांपासून ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथे मिळालेल्या प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक गुरूने अभिनयाचे तंत्र, कलाविषयक जाण आणि सादरीकरणाची शिस्त शिकवली. व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरही अनेक ज्येष्ठ कलाकारांकडून खूपकाही शिकायला मिळाले. सर्व गुरूंनी दिलेली शिकवण हीच माझ्या कलाप्रवासाची खरी शिदोरी आहे.

Marathi Artists
Pune Illegal Construction Demolition: पुणे महापालिकेचा बुलडोझर पुन्हा धडाडला; लोहगाव-खराडीत २१ हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

राधिका देशपांडे (अभिनेत्री): माझे वडील संजय पेंडसे आणि अध्यात्मिक गुरू श्यामराव जोशी हे दोघेही माझ्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे गुरू. वडिलांनी अभिनयासह चालणे, बोलणे, वागणे आणि जीवन जगण्याची पद्धत शिकवली. आयुष्यातील कठीण काळात श्यामराव जोशी यांनी मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक बळ दिले. त्यांनी माझ्या आवाजावर संस्कार केले. त्यांच्याकडून मला शब्दोच्चार आणि आवाजाचा प्रभावी वापर कसा करावा, हे शिकायला मिळाले.

स्मिता गोंदकर (अभिनेत्री): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक क्षेत्रात मला वेगवेगळे गुरू लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विविध क्षेत्रांत काम करताना योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. आजही प्रत्येक नव्या कामातून काहीतरी शिकण्याची वृत्ती कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करते. माझे पहिले आणि सर्वश्रेष्ठ गुरू म्हणजे माझे आई-वडील. त्यांनीच मला आयुष्याची मूल्ये, संस्कार, योग्य-अयोग्याची जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news