पुणे : अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

पुणे : अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले

महेंद्र कांबळे

पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत स्थानिक पोलिसांना न दिसणार्‍या अवैध धंद्यांवर छापे टाकून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा एकदा कडक कारवाईच्या दृष्टीने पावले उचलल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांत शहरात चालणार्‍या 20 हून अधिक बेकायदा धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून संबंधितांच्या मुसक्या आवळल्या. सामाजिक सुरक्षा विभागाची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी व त्यांच्या पथकाने दीड महिन्यात शहरात वेश्याव्यवसाय आणि जुगार अड्डा, हुक्कापार्लर अशा तब्बल 15 हून अधिक अवैध धंद्यांवर कारवाया केल्या. यामध्ये त्यांनी अटकेचीदेखील कारवाई केली आहे.

आंबेगाव येथील वेश्या व्यवसायावर छापा, ससून रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, बाणेर येथील वेश्या व्यवसायावरील छापा, खडकी, स्वारगेट, औंध, हडपसर येथे जुगार अड्ड्यावरील टाकण्यात आलेल्या छाप्यांबरोबर शनिवारी रात्री उशिरा उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकलेला छापा ही कारवाईची ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची करडी नजर आहे.

स्थानिक पोलिसांवर नामुष्की

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून हमीपत्र लिहून घेतले होते. त्यामध्ये त्यांच्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदा धंदे चालणार नाहीत, अशी लेखी हमी घेतली होती. त्यानंतरही धंदे सुरूच राहिल्यास निरीक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. ही कारवाई आता काही अंशी थंडावल्याचेच चित्र आहे. तरी सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईने संबंधित स्थानिक पोलिसांना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे.

जुगार अड्ड्यावर छापा; 22 जण ताब्यात

सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास केलेल्या कारवाईत लाखोंची रक्कम जप्त करतानाच तब्बल 22 जणांना रेडहँड पकडले आहे. जुगार चालक बाळू सीताराम मराठे (वय 51, कोथरूड), सचिन बाळासाहेब गायकवाड (वय 38) तसेच जुगार खेळणारे कुमार शेट्टी रायडू (वय 54), लक्ष्मण पांडुरंग कासार (वय 45), नरेंद्र भवरलाल राव (वय 45), नितीन दिनकर मोरे (वय 45) गणेश नथू दहिभाते (वय 47) किरण प्रकाश चौधरी (वय 38) वनाजी चंद्रकांत सटवते (वय 44) निसार सांडू सय्यद (वय 53) चंद्रकांत विठ्ठल कांबळे (वय 39) संतोष बबनराव माने (वय 35) ओंकार शशिकांत क्षीरसागर (वय 28) सचिन राजेंद्र कळमकर (वय 37) आणि या क्लबवर काम करणार्‍या स्वप्नील दत्तात्रय गायकवाड (वय 22) जितेंद्र दत्तोबा जाधव (वय 48) राज जयंता करकेरा (वय 42) मंगेश सुरेश काळे (वय 37) कृष्णा गोविंद लाकडे (वय 31) सुजित मेघनाथ मंडल (वय 30) अभिषेक जयसिंग गायकवाड (वय 21) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर जागामालक बाळासाहेब दांगट यांना 'पाहिजे आरोपी' केेले आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.8)उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर अगदी शाळेच्या जवळील भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पथकाला घेऊन रात्री एकच्या सुमारास येथे छापा कारवाई केली. त्यावेळी येथून तब्बल 22 जणांना ताब्यात घेतले. सुमारे दोन हजार स्क्वेअर फुटांच्या पार्किंग लॉटमध्ये हा जुगार सुरू होता. 2 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news