

शंकर कवडे
पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने बटाटा, टॉमेटो आणि शेवग्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. तर, लसणाचा हंगाम सुरू झाल्याने त्याच्या दरातही घसरण झाली. आवक रोडावल्याने काकडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले.
रविवारी (दि. 25) बाजारात राज्यासह परराज्यातून सुमारे 100 ट्रकमधून फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 12 ते 13 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो राजस्थानातून गाजर सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, भुईमुग कर्नाटक आणि गुजरातमधून
प्रत्येकी एक टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थानातून मटार 25 ते 26 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली होती. कांदा 175 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 550 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 10 ते 12 हजार क्रेट, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, ढोबळी 10 ते 12 मिरची, तांबडा भोपळा 14 ते 15 टेम्पो गाजर 3 ते 4 टेम्पो, घेवडा 5 ते 6 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, कांदा सुमारे 175 टेम्पो आवक झाली होती.
कोथिंबिरीची एक लाख जुडी आवक
तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे एक लाख तर मेथीची साठ हजार जुड्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कोथिंबिरीसह शेपू आणि पुदिनाच्या भावात वाढ झाली. तर, उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले. याखेरीज, हरभऱ्याच्या बारा हजार जुड्यांची आवक झाल्याची माहिती पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.