

पुणे: महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर अवघ्या तीन आठवड्यांत पुणे शहराला नवे महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेने महापौर व उपमहापौर निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली असून, त्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठविले होते. या प्रक्रियेमुळे फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर व उपमहापौर निवड होणार, हे निश्चित झाले होते. नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष सभा 6 फेबुवारीला होणार असून, या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता ही विशेष सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप शहरात सत्ता स्थापन करणार हे निश्चित आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पदे भाजपकडेच जाण्याची शक्यता असून, या पदांसाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. महापौरनिवडीच्या दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली अधिकृत सभा होणार असून, त्याच सभेत पुण्याला 58 वे महापौर मिळणार आहेत. मात्र, ही संधी कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या वेळी पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची गटनोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात येते. त्यानंतर मनपाच्या नगरसचिव कार्यालयाकडून महापौर व उपमहापौरनिवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जातो. या निवडीनंतर महापालिकेचे सभागृह औपचारिकरीत्या अस्तित्वात येते.
महापौर व उपमहापौरनिवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शुक्रवारी पत्र पाठवले होते. या पत्राला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त कार्यालयाशी झालेल्या चर्चेनंतर 6 फेबुवारी ही तारीख निश्चित केली आहे. या दिवशी सकाळी 11 वाजता पुणे महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. महापौर व उपमहापौर निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही आयुक्त राम यांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीमुळे पुण्याला भाजपच्या दुसऱ्या महिला महापौर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पद्धतीने मिळणार पुण्याला महापौर
महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या पत्रानंतर महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यानंतर महापालिकेची विशेष सभा कधी होणार? याबाबतची माहिती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते आणि विशेष सभेची नोटीस काढली जाते. या कालावधीत महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातात. निवडणुकीच्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत दिली जाते. एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास पीठासीन अधिकारी मतदान प्रक्रिया राबवितात. मतदानानंतर पीठासीन अधिकारी महापौर व उपमहापौरपदी निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करतात.