कडूसची ग्रामसभा गोहत्येवर ठरली वादळी; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

कडूसची ग्रामसभा गोहत्येवर ठरली वादळी; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

कडूस(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : कडूस येथे आषाढी एकादशीच्या दिवशी झालेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा पोलिस बंदोबस्तात वादळी झाली. या वेळी काही सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा रंगली. मात्र, त्यांनी खरोखर राजीनामा दिला की केवळ दिखावा केला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरपंच शहनाज तुरुक यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे अडीच तास रंगलेल्या या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

आषाढी एकादशीच्या दिवशी भर वस्तीत गोवंश हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गावात झालेल्या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेसाठी खेड पोलिस स्टेशन, दंगल नियंत्रण पथक जुन्नर विभाग यांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे ग्रामसभेला छावणीचे स्वरूप आले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळपासूनच गावात पोलिस फिरत होते.

ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर एका पिंजरा गाडीसह तीन पोलीस वाहने व पोलिसांच्या एवढ्या मोठ्या फौजफाट्यामुळे महिलांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली. अवघ्या चार महिला उपस्थित होत्या. पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षकासह सुमारे 30 पुरुष, महिला पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त होता.

ग्रामविकास अधिकारी श्रीराम राठोड यांनी विषयांचे वाचन केले. 15 वा वित्त आयोग व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत कामाचा वार्षिक आराखडा, थकीत करवसुली व त्यावर उपाययोजना, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणार्‍यांवर कारवाई, गावचे घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प उभारणी आदी मुद्द्यांसह ग्रामसभेत प्रामुख्याने गावातील सार्वजनिक कचरा समस्या दूषित पाण्याचा होत असलेला पुरवठा, घरकुल प्रश्न आणि जलव्यवस्थापनाचा ढेपाळलेला कारभार आदी प्रश्नांवरून नागरिकांनी ग्रामपंचायतीला चांगलेच घेरले.

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणार्‍या पवित्र गोवंश हत्येच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा यात सहभाग असल्याच्या मुद्द्यावर तरुणांनी आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. रंगेहात सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या सदस्याने राजीनामा द्यावा.

जिल्हा प्रशासनाच्या एकाही वरिष्ठ अधिकार्‍याने घटनास्थळी साधी भेटसुद्धा दिली नाही, त्यावरून प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा निषेध म्हणून सरपंच व सर्व सदस्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तरुणांनी ग्रामसभेत लावून धरली होती. या चर्चेत तुषार मोढवे, अमोल ढमाले, प्रशांत गारगोटे, मच्छिंद्र पानमंद, वैभव ढमाले, प्रज्वल मंडलिक, महेश कड, कुमार धायबर, सौरभ नेहेरे, शंकर डांगले, नंदू मुसळे, आबा धायबर, संदीप बंदावणे, बाळासाहेब बोंबले, गणेश धायबर, आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

माझ्याकडे कुठल्याही सदस्याचा विहित नमुन्यात राजीनामा आलेला नाही. सदस्य हे राजीनामा सरपंचाकडे स्वतः वैयक्तिक अर्जासह विहित नमुन्यात देत असतात. तो राजीनामा सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना देतात. नंतर तो मासिक बैठकीमध्ये ठेवला जातो. त्यानंतर तो गटविकास अधिकारी यांना दिला जातो. पुन्हा तो जिल्हाधिकारी यांना दिला जातो.

– श्रीराम राठोड, ग्रामविकास अधिकारी

माझ्याकडे कुठल्याही सदस्याचा राजीनामा अर्ज विहित नमुन्यात आलेला नाही.

– शहनाज तुरुक शेख,
सरपंच, कडूस

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news