

मुंढवा: घोरपडी परिसरात वीजेच्या खांबांवर टाकण्यात आलेल्या अनधिकृत केबलवर कारवाई करण्यासाठी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे पथक गेले होते. मात्र, केबल टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करू नका, अशी दमबाजी केल्याने हे पथक कारवाई न करताच माघारी फिरल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंढवा, घोरपडी आणि कोरेगाव पार्क परिसरात वीजेच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत केबल जाळे निर्माण झाले असून, यामुळे परिसराच्या सौंदर्याला बाधा येण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाने अनधिकृत केबलवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
घोरपडी येथील भारत फोर्ज ते भीमनगर रस्त्याच्या बाजूला शनिवारी (ता. ८) विद्युत विभागाच्या पथकाने वीजेच्या खांबांवरील अनधिकृत केबलवर कारवाई सुरू केली. मात्र, केबल टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींनी या कारवाई करण्यास विरोध केला. या ठिकाणी 'कारवाई करू नका', अशी दमबाजी या व्यक्तींनी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली. त्यानंतर कारवाई न करताच हे पथक माघारी परल्याचे नागरिकांनी सांगितले.
या प्रकारामुळे महापालिकेच्या कारवाईच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठोस कारवाई करण्याची भूमिका महापालिकेने घेतल्यावर संबंधित व्यक्तींना या कारवाईत हस्तक्षेप केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी देखील कारवाई थांबवली. यामुळे प्रशासनाकडून केवळ दिखाव्यापुरतीच कारवाईचा फार्स केला जातो का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमबाजी करून कारवाई थांबवण्याचे धाडस संबंधित व्यक्तींकडून होत असेल, तर अनधिकृत केबल माफियांवर प्रशासन ठोस कारवाई कधी करणार? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दमबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
घोरपडी येथे अनधिकृत केबलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणार्या तसेच दमबाजी करणार्या संबंधितांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. तसेच, परिसरातील सर्व अनधिकृत केबल तत्काळ हटवून कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनधिकृत केबलवर कारवाई करण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ मर्यादित आहे. तसेच, केबलवर कारवाई करताना पोलिस बंदोबस्त उपलब्ध असणे आवश्यक आहे. पोलिस बंदोबस्त आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास अनधिकृत केबलवर ठोस कारवाई करणे शक्य होईल.
रोहन मुतंगे, विद्युत निरीक्षक, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय