लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच! आमदार महेश लांडगे

लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच! आमदार महेश लांडगे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र, लोकवस्तीमध्ये किंवा नागरी आरोग्याच्या तक्रारी येतील, अशा ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारू नये, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी परिसरात सिल्व्हर-9 या सहकारी गृहरचना संस्थेच्या जी-बिल्डिंग शेजारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोकळी जागा आहे. या ठिकाणी कचरा संकलन केंद्र किंवा कचरा विलगीकरण केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.

वास्तविक, या परिसरातील लोकवस्ती वाढली असून, सुमारे 5 हजार नागरीक वास्तव्यास आले आहेत. कचरा संकलन केंद्रातून निर्माण होणार्‍या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतील. या भीतीमुळे या ठिकाणी कचरा संकलन केंद्र नको, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

त्यामुळे प्रशासनाने सदर केंद्राचे स्थलांतर करावे, अशी आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. तसेच, चिखली-मोशी-चर्‍होली पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राला विरोध केला आहे. या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कासारवाडी आणि गवळीमाथा येथे अशाप्रकारचे कचरा संकलन केंद्र प्रायोगिक तत्त्वावर उभारले आहे. त्या ठिकाणी लोकवस्ती नाही. तशाच प्रकारे शहरातील सर्व कचरा संकलन आणि वाहतूक केंद्र उभारण्याबाबत प्राधान्य द्यावे. तसेच, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करु नये, अशी आमची भूमिका आहे.

– महेश लांडगे, आमदार,
भाजप

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news