शिरूर : ढापे चोरणारी टोळी 14 तासांत गजाआड

शिरूर : ढापे चोरणारी टोळी 14 तासांत गजाआड

शिरूर/टाकळी हाजी(पुणे) : पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधार्‍याचे ढापे चोरणार्‍या टोळीला वडनेर (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडून गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय यादव, अजयकुमार दुखी मौर्य, वीरेंद्रकुमार केसरीप्रसाद, टेम्पोचालक गोरक्षनाथ अंबादास गोंडे (सर्व जण रा. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि पिकअपचालक प्रकाश धोंडीबा गावडे (रा. आंबेगाव, ता. आंबेगाव) अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करून टेम्पो, पिकअप आणि चोरी केलेले 62 ढापे ताब्यात घेण्यात आले.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, शनिवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास वडनेर येथील नाथा शंकर निचित यांच्या घराजवळील पाटबंधारे विभागाने काढून ठेवलेले ढापे टेम्पोमध्ये भरत असताना निचित यांच्या मजुरास जाग आली होती. त्याने बाहेर येऊन बॅटरीचा उजेड करताच चोरट्यांनी टेम्पो घेून तेथून पळ काढला होता.

या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी शिरूर पोलिसांना जलदगतीने कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत सहायक फौजदार मांडगे, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, होमगार्ड आकाश येवले यांना बरोबर घेऊन पथकामार्फत पिकअप चालक प्रकाश गावडे यास पिकअपसह टाकळी हाजी येथून, तर फरार आरोपींना सिन्नर येथून ताब्यात घेतले. शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणारी टोळी गजाआड झाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news