मंचर : आदिवासी विद्यार्थ्यांना कोटमदरा मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्नपुरवठा | पुढारी

मंचर : आदिवासी विद्यार्थ्यांना कोटमदरा मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्नपुरवठा

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विद्यार्थ्यांना आता कोटमदरा (ता.आंबेगाव) मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्नपुरवठा सुरू झाला आहे. शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत जेवण पुरविणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.
आश्रमशाळा व वसतिगृहांतून शिकणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना ताजे व सकस अन्न मिळावे, म्हणून कोटमदरा येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह यंदापासून सुरू झाले आहे. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घोडेगाव प्रकल्पातील 14 आश्रमशाळा व 14 वसतिगृहातील 6200 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्न पुरवत आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या घोडेगाव प्रकल्पातील निवासी आश्रमशाळा व आदिवासी मुला-मुलींची स्वयंपाकगृहाची दररोज दहा हजार विद्यार्थ्यांचे अन्न तयार करण्याची क्षमता आहे. आदिवासी मुलांच्या आश्रम शाळांबरोबरच शासकीय वसतिगृहातील मुलांनाही जेवण पुरविले जाणार आहे. घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, सहायक प्रकल्प अधिकारी कैलास खेडकर, सोनुल कोतवाल यांनी नुकतीच स्वयंपाकगृहास भेट देऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त आहे. स्त्रीशक्ती संस्थेच्या रेनी गडोक, सुजाता डफळ, मनिंदर बेदी, व घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

सकस प्रकारचे अन्न मिळत असल्याने विद्यार्थी खुश आहेत. काही त्रुटी असल्या तरी त्या दुरुस्त होऊन विद्यार्थ्यांना सकस अन्न मिळण्यासाठी मदत होईल, असे मत राजपूर शासकीय आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नवनाथ भवारी म्हणाले. मंचर आदिवासी मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल दत्तू डामसे यांनी काही त्रुटी असून, त्याबाबत संबंधितांना बोलल्याचे सांगितले. शिनोली वसतिगृहातील गृहपाल आर.व्ही.माळवे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोटमदरा स्वयंपाकगृहासाठी जवळपास 5 कोटी 25 लाख 72 हजार एवढे पैसे खर्च झाले आहेत. परिपूर्ण आहार दिल्लीतील स्त्रीशक्ती संस्था पुरवत आहे. जेवणाचे नियोजन करण्यासाठी नियंत्रण समिती नेमली आहे. जेवण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पुरविण्याबाबत नियोजन सुरू आहे.

– बळवंत गायकवाड,
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील पहिले सेंट्रल किचन कोटमदरा येथे सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना सकस अन्न देण्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे.

– संजय गवारी, माजी सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती

हेही वाचा

वालचंदनगर : डाळिंब बागांना क्रॉप कव्हरने नवसंजीवनी

बारामती : पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या ! शेतकरी पाहताहेत चातकाप्रमाणे पावसाची वाट

Back to top button