

पुणे: गणपती बाप्पा मोरयाचा, मंगलमूर्ती मोरयाचा दुमदुमलेला जयघोष...उत्कृष्ट देखाव्यांसाठी पारितोषिक स्वीकारल्यानंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष अन् नृत्य-गायनाच्या बहारदार कार्यक्रमाला मिळालेली टाळ्यांची दाद...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शनिवारी (दि. ३) पुढारी माध्यम समूह आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीने आयोजित 'गणाधीश नवोन्मेष स्पर्धे'चा पारितोषिक वितरण सोहळा रंगला. पारितोषिक हातात येताच तरुणांसह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला आणि लहान मुलांनी जल्लोष करत बाप्पाचा जयघोष केला. नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या भक्तिगीते, भावगीते, देशभक्तिपर गीते आणि नृत्याविष्काराने सोहळ्याला सांस्कृतिक रंग भरला. उत्साह अन् चैतन्यात रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाच्या परंपरेची साक्ष दिली.
पुण्यातील गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा, मंडळांच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि देखाव्यांमधून मांडल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना गौरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहर आणि उपनगरातील श्रीगणेश मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांच्या आरतीने झाली. आरतीनंतर सभागृहात 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष दुमदुमला आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर, माजी उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक गणेश घोष, 'पुढारी'च्या पुणे विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. दै.'पुढारी'च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक ॲड. शिरीष शिंदे, प्रसाद भडसावळे, दत्तात्रय वेताळ, राजेंद्र करंदीकर, मनीषा निंबाळकर, अनंतलक्ष्मी कैलासन, अनिल खोले, स्मिता खोले, विनायक सोनवणे आणि माणिक ओसवाल यांचाही सन्मान करण्यात आला.
'गणाधीश नवोन्मेष स्पर्धे'त उत्कृष्ट देखावे, ऐतिहासिक देखावे, जिवंत देखावे, सामाजिक देखावे आणि उपनगरातील मंडळांचे देखावे, अशा पाच विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विविध मंडळांनी धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक तसेच समकालीन विषयांवर आधारित देखावे सादर केले. नावीन्यपूर्ण संकल्पना, आकर्षक मांडणी आणि सामाजिक संदेश यामुळे देखाव्यांनी परीक्षकांचे लक्ष वेधले. याच लक्षवेधी मंडळांना आणि कार्यकर्त्यांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. पारितोषिकप्राप्त मंडळांची नावे जाहीर होताच सभागृहातील उत्साह आणखी वाढत गेला. पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांनी 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला. पुरस्कार मिळाल्यानंतर तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ, महिला आणि लहान मुलांनीही आनंद साजरा केला. मंडळाच्या वर्षभराच्या मेहनतीला मिळालेली ही कौतुकाची थाप असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
उत्कृष्ट देखावे
प्रथम क्रमांक - नवग्रह मित्र मंडळ (कसबा पेठ) देखावा - श्री काळभैरवनाथ मंदिर - (जुन्नर, खामुंडी).
द्वितीय क्रमांक - एकता मित्र मंडळ (अरण्येश्वर, तावरे कॉलनी) - देखावा - व्यसन आख्यान.
तृतीय क्रमांक - हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट (बाबू गेनू चौक, बुधवार पेठ) - देखावा - सोरटी सोमनाथ मंदिर.
उत्तेजनार्थ प्रथम - युगंधर मित्र मंडळ (आनंद नगर, सिंहगड रस्ता) - देखावा - भरकटलेले एक पाऊल, चुकीच्या दिशेने - एआयचा वापर
उत्तेजनार्थ द्वितीय - लाकडी गणपती मंडळ (खडक पोलिस ठाण्यासमोर - मामलेदार कचेरी जवळ) देखावा - अष्टविनायक.
ऐतिहासिक देखावे
प्रथम क्रमांक - श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान (हनुमान क्लब) - (माणिक चौक, कसबा पेठ) - देखावा - पुनवडी.
द्वितीय क्रमांक - शिवगर्जना मित्र मंडळ (वडाचा स्टॉप, कर्वेनगर) - देखावा - आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक (जिवंत देखावा).
तृतीय क्रमांक - दर्शन मित्र मंडळ ट्रस्ट (शिवदर्शन चौक) - देखावा - अहंकाराचे रावणायन.
उत्तेजनार्थ प्रथम- विजय मारुती मंडळ ( नारायण पेठ) - देखावा - मार्कंडेय ऋषी, मृत्यूवर विजय.
उत्तेजनार्थ द्वितीय - भारत माता मित्र मंडळ (कसबा पेठ) - देखावा- स्वराज्याचे आख्यान - (जिवंत देखावा).
जिवंत देखावे (प्रसंग नाट्य)
प्रथम क्रमांक - श्री शनीमारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट (गणेशनगर, एरंडवणे) - देखावा - अकाली उमललेली फुले - (किशोरवयीन मुले लवकर वयात येतात).
द्वितीय क्रमांक - हिराबाग मित्र मंडळ (टिळक रस्ता) - देखावा - अहिरावण वध-पंचमुखी हनुमान महाअवतार.
तृतीय क्रमांक - पेरुगेट चौक मित्रमंडळ ट्रस्ट ( पेरुगेट, सदाशिव पेठ) - देखावा - अजिंक्य योद्धा- बाजीराव पेशवा (जिवंत देखावा).
उत्तेजनार्थ प्रथम - हिंद तरुण मंडळ (केदारी रोड, लष्कर) - देखावा - वंदेमातरम (जिवंत देखावा).
उत्तेजनार्थ द्वितीय - नवरंग मित्र मंडळ ट्रस्ट (हडपसर) - देखावा - गुन्हेगारीला घालू आळा- लोकशाहीला लावू लळा.
सामाजिक देखावे
प्रथम क्रमांक - सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ (नरपतगीरी चौक, सोमवार पेठ) - देखावा - भोंदूगिरी आणि बुवाबाजीवर आधारित - बाबा अँटीव्हायरस देखावा.
द्वितीय क्रमांक- अजिंक्य मित्र मंडळ ( संत ज्ञानेश्वर पादुका चौक, मॉडेल कॉलनी) - देखावा - अन्नभेसळ.
तृतीय क्रमांक - श्री शिवाजी चौक मित्र मंडळ (शुक्रवार पेठ, मामलेदार चौक) - देखावा - आजचे आम्ही, उद्याचे तुम्ही.
उत्तेजनार्थ प्रथम - जनजागृती मंडळ ( शुक्रवार पेठ) - देखावा - श्रद्धा डोळस हवी.
उत्तेजनार्थ द्वितीय - भिकारदास मारुती मित्र मंडळ (सदाशिव पेठ) - देखावा - वीर शिवा काशिद.
उपनगरातील देखावे
प्रथम क्रमांक - उषःकाल मित्र मंडळ (महंमद वाडी) - देखावा - नव्या युगाची ओळख.
द्वितीय क्रमांक - नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट (नवी खडकी, येरवडा) - देखावा - बोलणारा रोबो, रोबोटिक आर्म, अँटी ड्रोन सिस्टिम- येरवडा.
तृतीय क्रमांक - आझाद हिंद मित्र मंडळ (विठ्ठलनगर, वडगाव शेरी) - देखावा - अन्नभेसळ- (जिवंत देखावा).
उत्तेजनार्थ प्रथम - अखिल गणेशबाग मित्र मंडळ (गणेश बाग, मुंढवा रस्ता) - देखावा- महाल.
उत्तेजनार्थ द्वितीय - साई मित्र मंडळ (आंबेगाव पठार, धनकवडी) देखावा- भारतीय वायुसेना - इतिहास ते विकास.