

पिंपरी(पुणे); वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बांधकाम व्यावसायिकास लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ ऑक्टोबरला महापालिका भवनाच्या आवारात सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. माजी नगरसेवक पतीच्या राड्याची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली होती.
भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोर्हाडे यांचे पती नितीन बोर्हाडे यांनी हा पराक्रम केला आहे. महापालिकेत दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. हा प्रकार घडला तेव्हाही नागरिकांची ये-जा सुरू होती. त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकास सर्वांदेखत हात उचलला. त्यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्यांना लाथाने मारले. नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांना आवरल्याने पुढील अनर्थ टळला.
नितीन बोर्हाडे यांचे चुलते आणि त्या बांधकाम व्यावसायिकाची बोर्हाडेवाडीत जमीन आहे. दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्याची सुनावणी आज महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोर्हाडे आणि बांधकाम व्यावसायिकामध्ये वाद झाला. यातून नितीन बोर्हाडे यांनी आधी त्यांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बोर्हाडे यांना रोखले आणि प्रकरण तेथेच निवळले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या प्रकरणाची महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
हेही वाचा