पुणे : गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारूचा ट्रक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. खेड-शिवापूर नाक्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 82 लाख 8 हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले असून, तब्बल 93 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विपुल देवीलाल नट (वय 32, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी टेम्पोमधून 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की' या विदेशी मद्याची वाहतूक करीत होते. उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पथक गस्तीवर होते. या दरम्यान मुंबई – बंगळुरू महामार्गावरून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्य टेम्पोतून जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून खेड-शिवापूर नाक्यावर पाळत ठेवली होती. तिथेच टेम्पो अडविला. या वेळी चालकाने टेम्पोत औषधे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता औषधाचे बिल टीपी, टॅक्स इन्व्हॉईस आणि इ वे बिल दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाला बातमीदारामार्फत पक्की खबर मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए. सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा