गडहिंग्लज, बिद्री पाठोपाठ आजर्‍यात विजय, हसन मुश्रीफांची हॅट्ट्रिक | पुढारी

गडहिंग्लज, बिद्री पाठोपाठ आजर्‍यात विजय, हसन मुश्रीफांची हॅट्ट्रिक

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माघार घेण्याचे ठरले असतानाही ऐनवेळी ज्यांच्यासाठी माघार घ्यायची त्यांच्याकडूनच अपमानास्पद वक्तव्य झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समर्थकांनी पॅनेल करण्यास भाग पाडले. अपमानाचा बदला गुलाल उधळून घेत मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज, दुधगंगा-वेदगंगा-बिद्री पाठोपाठ आजर्‍यात विजय मिळवून साखर कारखान्यातील विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. या विजयाने मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांना बळ मिळाले आहे. चराटी, शिंपी, शिंत्रे आणि रेडेकर गटाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. 19 जागांवर मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळविला आहे.

आजरा कारखाना निवडणूक बिनविरोध होणार हे ठरले होते. मुश्रीफ यांच्या समर्थकांनी निवडणुकीतून माघार घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे यांच्यात बैठकही झाली. या बैठकीत कारखाना निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. तो जाहीरही झाला. मात्र, मुश्रीफ यांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता. तुमच्या निवडणुका आल्या की तुम्ही लढायचे आणि आम्हाला लढायची संधी आली की माघार घ्यायला लावायची हे बरोबर नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून मुश्रीफ आपल्या दौर्‍यासाठी रवाना झाले आणि थेट तीन दिवसांनी कागलमध्ये आले.

तोवर निवडणुकीचा रंग चांगलाच चढला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे पॅनेल आकाराला आले होते. या पॅनेलचे नेते अशोक चराटे, जयवंतराव शिंपी, सुनील शिंत्रे, अंजना रेडेकर यांनी पॅनेलची घोषणा केली. त्याचवेळी या पॅनेलकडून राष्ट्रवादीला उद्देशून अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले.

कारखान्यावरील कर्जाला राष्ट्रवादीवाले घाबरले, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून ते पळून गेले, राष्ट्रवादीने पळ काढला, असे आरोप करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणताच संतप्त झालेल्या मुश्रीफांनी पॅनेल करण्याचा आदेश दिला. अर्ज माघारीच्या आदल्या दिवशी पॅनेलकरून मुश्रीफ यांनी विजयाचा झेंडा फडकवला. मुश्रीफ यांचा हा विजयरथ पूर्ण तयारीनिशी व ताकतीने उतरलेल्या त्यांच्या विरोधकांना रोखता आला नाही हे त्यांचे अपयश आहे.

मुळात विनय कोरे आणि सतेज पाटील यांचा या कारखान्याशी संबंध काय? हा माझा मतदार संघ आहे असे म्हणत मुश्रीफ यांनी विरोधकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर जाहीर प्रचार सभेत बोलताना मुश्रीफ यांनी विरोधी पॅनेलमध्ये विनय कोरे व सतेज पाटील यांचे फोटो लावायचा की नाही, यावरूनच मतभेद झाल्याचे सांगून त्यांना खिंडीत गाठले. आपल्याच मतदारसंघात आपल्या विरोधकाला विरोधकांनी बळ दिल्याचा रागही मुश्रीफ यांना होता. या सगळ्याची परतफेड मुश्रीफ यांनी या विजयाने केली आहे.

मुळात हा कारखाना मुश्रीफ यांच्या मतदारसंघात आहे. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे त्यांनी आरोपाचे खंडण केले. ते सभासदांना पटल्याचे निकालावरून दिसून येते. मुळात हा कारखाना घेऊन बंद पाडायचा आणि आपल्या कारखान्याला ऊस न्यायचा, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर झाला. त्याचवेळी त्यांनी हा कारखाना सुरू व्हावा म्हणून प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे सभेत सांगितली. त्याचबरोबर आता कारखाना चालवायचा तर केवळ उसापासून साखर करून चालणार नाही, तर सहवीज आणि इथेनॉलचे प्रकल्प उभे करावे लागतील. मात्र, हे प्रकल्प येथे उभारण्यात इको सेन्सिटिव्ह झोनचा अडथळा आहे, हा अडथळा पार करता येईल. पहिल्यांदा कारखाना झाला नंतर इकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर झाला. त्यामुळे या करखान्याला या तरतुदी लागू होत नाहीत, हे आपण केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना भेटून सांगू, अशीही भूमिका मांडली. ती सभासदांना पटल्याचे निकालावरून दिसते.

विजय मिळाला, मात्र आव्हान कायम

कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर आर्थिक सहाय्याचा मुद्दा पुढे येतो. मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे कारखान्याची सूत्रे दिल्यास कारखान्याला आर्थिक संकट सहन करावे लागणार नाही, असा विचारही सभासदांनी केला असावा. याच गोष्टी मुश्रीफ यांना विजयापर्यंत घेऊन गेल्या आहेत. आता कारखाना चांगला चालवून, ऊस उत्पादकांना अधिक दर देऊन उपप्रकल्प उभारण्याचे आव्हान मुश्रीफ यांना पेलावे लागणार आहे.

आपटेंनी दिले रिटर्न गिफ्ट

गोकुळच्या निवडणुकीत अशोक चराटी यांनी रवींद्र आपटे यांना ऐनवेळी मदत केली नाही. त्याचा राग आपटे यांना होता. आजर्‍याचा निकाल पाहता आपटे यांनी आपल्या या रागाचे रिटर्न गिफ्ट चराटी यांना दिल्याचे बोलले जात आहे.

Back to top button