पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आता योजना संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या तब्बल 28 योजनांची माहिती मिळणार आहे. त्यासाठी योजना संचालनालयाने एक क्यूआर कोड तयार केला असून, हा कोड पाठ्यपुस्तके तसेच किशोर मासिकामध्ये छापण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आणि शिक्षण विभागातील अधिकार्यांची नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बालभारतीकडून विद्यार्थ्यांसाठी नोटबुक तयार करण्यात येत आहे. या नोटबुकमध्ये पहिल्या व शेवटच्या पानावर योजना संचालनालयाच्या विविध योजनांची माहिती देण्यात यावी सोबत क्युआर कोड देण्यात यावा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेची माहिती मिळणे शक्य होईल, असे मत सहायक योजना अधिकारी विराज खराटे यांनी मांडले.
ही कल्पना शिक्षण आयुक्तांना आवडल्यामुळे त्यांनीदेखील तंत्रस्नेही व्यक्तीकडून योजनानिहाय क्यूआर कोड तयार करण्यात यावा आणि बालभारतीसोबत चर्चा करून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावर बालभारतीने विविध योजनांसाठी अनेक क्यूआर कोड तयार करण्याऐवजी एकच क्यूआर कोड तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
विविध योजनांसाठी वेगवेगळे क्यूआर कोड न करता एकच क्यूआर कोड तयार करावा अशी सूचना बालभारतीची होती. त्यानुसार 28 योजनांचा एकच क्यूआर कोड तयार करण्यात आला असून, तो बालभारतीकडे देण्यात आला आहे. आत्ता लगेच किशोर मासिकात आणि येत्या काळात बालभारतीच्या पुस्तकांमध्ये संबंधित योजनांचा क्यूआर कोड छापण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच क्युआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योजना संचालनालयाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.
– महेश पालकर, संचालक, योजना संचालनालय.
हेही वाचा