Pune: बनावट नोटांचे रॅकेट; दोन महिलांसह पाच जणांना बेड्या

28 लाखांच्या खोट्या नोटा जप्त
Pune: बनावट नोटांचे रॅकेट; दोन महिलांसह पाच जणांना बेड्या
Pune: बनावट नोटांचे रॅकेट; दोन महिलांसह पाच जणांना बेड्याPudhari
Published on
Updated on

पुणे: शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 28 लाख 66 हजार रुपये किमतीच्या बनावट, तर दोन लाख चार हजार रुपयांच्या खर्‍या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

तसेच, नोटा छापण्याचे प्रिंटर, शाई, कोरे कागद, मोटार असे साहित्य देखील मिळून आले आहे. दरम्यान, या टोळीची व्याप्ती मोठी आहे. परराज्यांपर्यंत त्याचे धागेदोरे असून, रॅकेटमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Pune: बनावट नोटांचे रॅकेट; दोन महिलांसह पाच जणांना बेड्या
भाजप जिल्हाध्यक्षपदाचा ‘लखोटा’ 2 मे रोजी उघडणार

मनीषा स्वप्निल ठाणेकर (वय 35, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय 34, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय 35, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी (वय 42, रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी (वय 38,

रा. चिंचवड) ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासासाठी त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी ही माहिती सोमवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.

Pune: बनावट नोटांचे रॅकेट; दोन महिलांसह पाच जणांना बेड्या
शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण लांबण्याची शक्यता

...असा झाला रॅकेटचा पर्दाफाश

शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित बँकेत 17 एप्रिल रोजी 200 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जमा झाल्या असल्याचे तेथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. व्यवस्थापकांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी, तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

बँकेत कोणत्या खात्यात ही रक्कम भरली गेली तिथून तपासाला सुरुवात झाली. संबंधित खातेधारकाने या नोटा खर्‍या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होत्या. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्या असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा छडा पोलिसांना लागला.

ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे व तत्सम आर्थिक व्यवसाय करते. तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या बनावट शंभर नोटा जप्त केल्या. तिच्या चौकशीत आरोपी भारती गावंड हिचे नाव उघडकीस आले. तिच्याकडून दोनशे रुपयांच्या तीनशे नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तिच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सचिन यमगर याला ताब्यात घेतले.

या तिघांनी कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून या बनावट नोटा मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष तपासात कोल्हे हे नाव आरोपी शेट्टी धारण करत असल्याचे निष्पन्न झाले. लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना तिथे चार लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा आढळल्या.

त्याच्याकडे नोटा छापायचा प्रिंटर, शाई, कागद व खरे दोन लाख रुपये मिळाले. त्याच्याकडील दोनशे व पाचशे रुपयांच्याही नोटा मिळाल्या. काही नोटा एका बाजूने छपाई झालेल्या होत्या. या टोळीमध्ये प्रभू गुगलजेड्डी हाही सामील असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली.

एक लाखाला दोन लाखांच्या बनावट नोटा

या टोळीने यापूर्वी कोणाला बनावट नोटा दिल्या आहेत, त्यासाठी लागणारा कागद त्यांनी कोठून विकत घेतला व त्याबाबतचे तंत्रज्ञान त्यांना कोणी दिले, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एक लाख रुपयांना बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा ही टोळी देत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

त्याचबरोबर या टोळीमध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचीही माहिती पुढे आली असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सावंत, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. डाबेराव, उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी नलिनी क्षीरसागर, तेजस चोपडे, आदेश चलवादी, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रवीण दडस, रुचिका जमदाडे यांच्या पथकाने केली.

एका बँकेच्या मशिनमध्ये बनावट नोटांचा भरणा झाल्याची तक्रार आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आत्तापर्यंत दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाच जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

- संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news