

Pune Baner Police Station Constable
पुणे: इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून पोलिस ठाण्याचा ‘अर्थ’पूर्ण कारभार पाहणार्या ‘त्या’ पोलिस महाशयावर कारवाई करण्याऐवजी, त्याचा ‘तो’ फोटो कसा व्हायरल झाला याचीच चिंता बाणेर पोलिसांना लागली आहे. पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून फोटो बाहेर कसा गेला याचा शोध घेतला जात होता. त्याच्यासाठी पोलिस ठाण्याचे पथक गुरुवारी (दि.17) दिवसभर कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक पुढारीने ऑफ द रेकॉर्ड या सदरात ‘पद शिपायाचे आव इन्स्पेक्टरचा’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीनंतर असा कोण शिपाई आहे, जो अधिकार्यांना खिशात ठेवतो, इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून रुबाब करतो, अशी चर्चा पुण्यापासून थेट पोलिस महासंचालक कार्यालयापर्यंत दिवसभर सुरू होती.
या वृत्ताची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही गंभीर दखल घेतली असून, तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील या शिपायाचे अनेक कारनामे समोर आले आहेत. परंतु वरिष्ठांच्या खास मर्जीतील असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती.
इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसणे, पोलिस ठाण्याच्या कामात हस्तक्षेप करणे आणि पोलिस ठाण्यासमोरील स्वतःचे हॉटेल पहाटेपर्यंत बिनदिक्कत सुरू ठेवणे असे विविध प्रताप करणार्या या शिपायावर खरंतर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, बाणेर पोलिस या वजनदार शिपायाची पाठराखण करताना दिसून येत आहेत.
फोटो बाहेर कसा गेला ? तो कोणी काढला ? हे शोधण्यासाठी बाणेर पोलिस एवढी तत्परता दाखवत आहेत. परंतु त्या शिपायाने बाणेर पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यापासून काय काम केले ? त्याचे पोलिस ठाण्यात योग्य कर्तव्य बजावले का ? किती वेळा सकाळच्या हजेरीला उपस्थिती लावली ? किती दिवस गणवेश परिधान केला ? त्याचे हॉटेल एवढे दिवस पहाटेपर्यंत कसे सुरू राहते ? अवैध धंद्यावरील कारवाईत त्याचा हस्तक्षेप कसा ? या सर्व प्रकरणांचे सीसीटीव्ही फुटेज काढण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी दाखवतील का ? हा मोठा सवाल विचारला जात आहे.
फोटो व्हायरल झाला म्हणून आपल्या पोलिस ठाण्यातील इतरांना संशयास्पद नजरेने पाहून, त्यांच्यावर ठपका ठेवला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे विभाजन होण्यापूर्वी हा शिपाई बाणेर पोलिस चौकीला वजनदार काम करत होता.
पुढे बाणेर पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर त्याच्याकडे संपूर्ण वजनदार कामाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे हा शिपाई सुसाट सुटला आहे. त्याला व्यसन घालण्याचे काम पोलिस आयुक्त अमितेश कुमार तरी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.