

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण-राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, राज्य शासनाने त्या ठिकाणी भव्यदिव्य व मजबूत असा पुतळा नव्याने उभारला आहे.
या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण 1मे या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला व यामुळे निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे या पुतळ्याचा नियोजित लोकार्पण सोहळा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे 200 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणार्या सागरी वार्यांचा सामना करण्यास सक्षम असा हा भव्य पुतळा राम सुतार क्रिएशन कंपनीच्या मालवण- राजकोट किनार्यावर पूर्वीच्या पुतळ्याच्या जागीच उभारण्यात आला आहे.
यापूर्वी नियोजित कार्यक्रमानुसार पुतळ्याचा लोकार्पण सोहळा 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता. मात्र, पहलगाम येथे पर्यटकांवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
1 मे चा मूहुर्त दिवसांवर आला असतानाही पुतळ्याच्या लोकार्पणासाठी अजूनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नसल्याने या शक्यतेला अधिक बळ मिळत आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पुतळा लोकार्पणाबाबत कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याचे सांगितले.