

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम सुरु आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पर्यवेक्षक व भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व निरीक्षक आ. हेमंत रासणे यांनी सातार्यात येऊन विविध मान्यवरांची मते जाणून घेतली. तसेच त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य असलेली प्रत्येकी तीन नावे घेतली. आता 2 मे रोजी प्रदेश कार्यालयातून जिल्हाध्यक्ष पदाचा ‘लखोटा’ उघडला जाणार आहे.
भाजपच्या मंडल अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या आहेत.आता जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. या अनुषंगाने राजेश पांडे आणि आ. हेमंत रासणे हे दोघेही सोमवारी सातार्यात दाखल झाले होते. त्यांनी सकाळपासूनच मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच त्यांच्याशी जिल्हाध्यक्ष पदाच्या अनुषंगाने चर्चा केली. येथील विश्रामगृहावर त्यांनी भाजपमधील 21 प्रकारच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली.
त्यामध्ये प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, भाजपचे नगराध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महिला, अनुसूचित जाती-जमाती, युवा मोर्चाचे अध्यक्ष आदींशी त्यांनी सविस्तर चर्चा करुन त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांच्या दृष्टिने योग्य असलेली तीन नावे घेतली. यावेळी प्रत्येकाला एक चार्ट देण्यात आला होता. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी ज्या व्यक्तीचे नाव सुचविले त्यांचे वय, त्यांनी भूषविलेली पदे, सामाजिक कार्य आणि ते जिल्हाध्यक्ष का व्हावेत? या प्रश्नाचे उत्तर या चार्टमध्ये भरुन घेण्यात आले. या ठिकाणी त्यांनी या पदाधिकार्यांशी गोपनीय चर्चा केली. आजी-माजी खासदार, आमदार यांच्या घरी भेटी देऊनही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जाईल. त्यानंतरच मुख्यमंत्री जिल्हाध्यक्षांचे नाव अंतिम करतील.
दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्याही घरी भेट देऊन त्यांनी पांडे, रासणे यांनी माहिती घेतली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानीही राजेश पांडे, आ. हेमंत रासणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दरबार हॉलमध्ये खा. उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाला प्राधान्य द्यावे, याबाबत त्यांनी या दोघांनीही उदयनराजेंचे मत जाणून घेतले.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची निवासस्थानीही भेट देत त्यांचे मत जाणून घेतले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, विठ्ठल बलशेटवार, संतोष कणसे, विकास गोसावी, प्रवीण शहाणे, अविनाश कदम, लक्ष्मण कडव उपस्थित होते.
भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच अंतर्गत मतदान झाले. 40 जणांची मते जाणून घेतली गेली. मात्र, हे मतदान घेताना ऐनवेळी इच्छुकांनी आपल्या जवळच्या लोकांना बोलावून घेतल्याचे समजते. वास्तविक मतदान घ्यायचे होते तर सर्व सदस्यांमधून घ्यायला हवे होते, अशी चर्चा मग त्याठिकाणी सुरु झाली. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी दोन महिलांनीही इच्छा व्यक्त केली. सुवर्णा पाटील व चित्रलेखा माने यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. भाजप महिलांना जिल्हाध्यक्षपदासाठी संधी देणार का? याची उत्सुकता आहे.