

भिगवण : उजनी धरणाच्या जलाशयात मच्छीमारी करणार्या स्थानिक मच्छीमारांनी आता तत्कालीन व सध्याच्या सरकारला लाजवायचे ठरविले आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही गेल्या 25 वर्षांपासून 'उजनी'त सरकारकडून मत्स्यबीज सोडले जात नाही. आता 'उजनी'काठी स्वखर्चाने मत्स्यबीज केंद्र स्थापन करून त्याद्वारे दरवर्षी दोन ते पाच कोटी मत्स्यबीज धरणात सोडण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे. उजनीतील स्थानिक पिढीजात मच्छीमारांच्या न्याय्य हक्कासाठी गेल्या 25 वर्षांपासून लढा सुरू आहे. यादरम्यान या मच्छीमारांनी सनदशीर मार्गाने, त्यानंतर अर्धनग्न, रास्ता रोको, टाळेठोक अशी विविध आंदोलने पुणे, मुंबईपर्यंत छेडली. 2008 च्या जाळपोळीचा धूर जेवढा 'उजनी'त पसरला होता, तेवढाच तो शासनदरबारी पसरला होता. यामध्ये शेकडो मच्छीमार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले व 12 वर्षांनी हे सर्वजण न्यायालयात निर्दोष सुटले. या निर्णायक लढ्यात दै. 'पुढारी'चे योगदान महत्त्वाचे मानले जाते. मात्र, त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच प्रकार प्रत्येक सरकारकडून झाले. आजही उजनी मच्छीमारांचा प्रश्न लाल फितीत अडकून ठेवण्यात आला आहे.
या लढाईत उजनीत गेल्या 25 वर्षांपासून मत्स्यबीज सोडण्यात आले नाही. उजनीची व्याप्ती लक्षात घेता दरवर्षी धरणात एक कोटी मत्स्यबीज सोडणे शासनाचे धोरण आहे. मात्र, मत्स्यबीज न सोडल्याने प्रमुख कार्प जातीचे रोहू, कटला, सायप्रानीस, मृगल, सिल्व्हर या जातीचे मासे बोटावर मोजण्याएवढेही राहिले नाहीत. वाढते प्रदूषण व बेकायदेशीर परप्रांतीय मच्छीमारांनी व्यावसायिक मासेमारी केल्याने या सर्वांचा गंभीर परिणाम होऊन 50 हून अधिक गावरान जाती उजनीतून नष्ट झाल्या आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कोयरा, आहेर, वाम, मरळ, घोगरा, मुनिया,आमली, कोळीस, कानस, चालट, शिवडा, शेंगळ, खदरा आदी जातींच्या माशांचा समावेश आहे.
यावरून मच्छीमारांच्या विविध मागण्यांचा लढा 1995 पासून आजपर्यंत अविरत चालू आहे. मात्र, कोणतेच सरकार याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. यावरून आता मच्छीमारांनी स्वावलंबी बनण्याचा मार्ग अंगीकारला आहे. यातून स्वखर्चाने उजनीच्या विविध भागांत पाच ते सहा मत्स्यबीज केंद्रे उभारण्यात येणार असून, दरवर्षी या केंद्रांतून मत्स्यबीजनिर्मिती होईल. ते वाढवून उजनीत सोडण्यात येणार आहे. यासाठी काही दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. उजनीत हा प्रयोग यशस्वी ठरला, तर राज्यातील मच्छीमारांपुढे हा आदर्श निर्माण होऊन राज्यभर स्वावलंबनाची क्रांती घडेल, असा विश्वास या मच्छीमारांना आहे.
आव्हान मोठे, शक्य नाही…
उजनीत प्रतिवर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडणे लक्षात घेता आत्तापर्यंत 25 कोटी मत्स्यबीज सुटले नाही, त्यामुळे एवढा अनुशेष भरून काढणे कठीण काम असले, तरी मच्छीमारांनी केलेली तयारी पाहता, हे अशक्य नसल्याचे दिसते. यामुळे किमान उजनीत प्रमुख कार्प जातीचे नष्ट झालेल्या माशांना येत्या चार-पाच वर्षांत गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा