पुणे : बेशिस्त अधिकारीही निशाण्यावर; जिल्हा परिषदेच्या ५ विभागप्रमुखांना नोटीस | पुढारी

पुणे : बेशिस्त अधिकारीही निशाण्यावर; जिल्हा परिषदेच्या ५ विभागप्रमुखांना नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक सोमवारी साडेदहा वाजता होती. मात्र, चार विभागप्रमुख वगळता इतर सर्व विभागप्रमुख अनुपस्थित होते. काहींनी तर उशिरा येण्याची हद्दच पार केली. कर्मचार्‍यांना काही दिवसांपूर्वी उशिरा येण्यावरून जाब विचारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभागप्रमुखांना देखील कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

बैठकीला ठराविक अंतराने दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांचे प्रमाण देखील अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अकरा वाजले तरी अनेक खाते प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे यापुढे साडेदहा ऐवजी कार्यालयीन वेळ सुरू होण्याच्या वेळेत पावणेदहा वाजता विभाग प्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला. तसेच यापुढे बैठकीला उशिरा येणार्‍या अधिकार्‍यांवर थेट कारवाई करण्याची तंबी देखील देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, विभागप्रमुखच अशा पद्धतीने लेट लतीफ होत असतील तर कर्मचारी आणि कनिष्ठ अधिकार्‍यांची अवस्था काय असेल याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती.

दरम्यान, तालुकास्तरावर पंचायत समित्यांमध्ये अनेकदा गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी आणि कर्मचारी दुपारनंतर गायब होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे वरिष्ठ कारवाई करत नसल्याने सध्या पंचायत समिती कार्यालयांमध्ये आनंदी आनंद आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत खाते प्रमुखांनाच कारणे दाखवा बजावण्यात आल्याने तालुका स्तरावरील कार्यालयांमधील यंत्रणा सतर्क होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या अधिकार्‍यांना दिल्या नोटिसा…

बैठकीला उशिरा येणार्‍या विभागप्रमुख अधिकार्‍यांमध्ये ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे, जिल्हा कृषी अधिकारी अशोक पवार, यांच्यासह मनरेगाच्या स्नेहा देव यांना कारणे दाखवा नोटीस सामान्य प्रशासन विभागाकडून सायंकाळी देण्यात आली.

हेही वाचा

कुरुलकरची हेरगिरी : ’गोपनीय माहिती’ या शब्दाला विरोध

‘मधाचे गाव पाटगाव’ला ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन गाव’ नामांकन

कोल्हापूर : अमृत योजनेसाठी दोन महिन्यांची डेडलाईन

Back to top button